माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

0

औरंगाबाद : भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी केली आहे. जाधव यांच्यावर गुन्हा द्फाख्ल झाल्यानंतर औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलेले नाही. हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.