माजी उपसंचालक, पेट्रोलपंप मालकासह वास्तुविशारदावर गुन्हा दाखल

0

विरार । वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक, वास्तुविशारद आणि पेट्रोलपंप मालकावर लाचलुचपत विभागाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गिरीश कामदार यांना बेकायदेशीरपणे पेट्रोल पंपासाठी परवानगी देऊन त्यांना फायदा पोहोचवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक यमीगनू शिवा रेड्डी, वास्तुविशारद विपुल आडीया आणि पेट्रोलपंप मालक गिरीश कामदार यांच्या विरोधात फसवणूक, कागदपत्रांची हेराफेरीयासह इतर गुन्हे लाचलुचपत विभागाने वालीव पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. वालीव येथील गोखीवरे येथे 27 जुन 2012 ते 14 जुलै 2015 या कालावधीत गिरीश कामदार यांनी पेट्रोलपंपासाठी परवानगी मागितली होती. तेव्हा तत्कालीन सिडकोने व महाराष्ट्र शासनाने टी जंक्शन असल्याने परवानगी नाकारली होती. मात्र, वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक यमीगनू शिवा रेड्डी यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा दुरउपयोग तसेच वरिष्ठांची दिशाभुल करत डी. सी. आर. प्रमाणे नियमात न बसणार्‍या जागेत गिरीश कामदार यांना बेकायदेशीरपणे पेट्रोल पंपासाठी परवानगी दिली होती. वास्तुविशारद विपुल आडीया यांनी उपसंचालक यमीगनू शिवा रेड्डी आणि गिरीश कामदार यांच्याशी संगनमत करुन बनावट सह्या आणि शिक्याचा नकाशा लावला होता.

आरोपींना अटक होणार का?
या प्रकरणी फसवणूक करून संघटितपणे बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना पोलीस अटक करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे यांना लाचलुचपत विभागाने वगळले असल्याचे तत्कालीन फिर्यादी धनंजय गावडे यांनी सांगितले. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक वाय शिवा रेड्डी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने 28 एप्रिल 2016 रोजी लाच देताना रंगेहाथ अटक केली होती. रेड्डी यांनी कोणतीही माहिती मागू नये म्हणून गावडे यांना 1 कोटी रुपये लाच देण्याचे ठरवले. याबाबतची तक्रार गावडे यांनी लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता या लाचेचा 25 लाखांचा पहिला हफ्ता देताना रेड्डी यांना ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.