माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी

0

पिंपरी-चिंचवड : खराळवाडी येथील एका माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचा पती अ‍ॅड. सुशील मंचरकर आणि अन्य दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने तिघांना मंगळवारपर्यंत (दि. 19) पोलीस कोठडी सुनावली आहे.

फरार गुन्हेगारांची कबुली
वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना पुणे पोलिस सातारा, खंडाळा येथील न्यायालयात घेवून गेले होते. रात्री तेथून परत येताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाले. प्राथमिक फिर्याद देताना पोलिसांनी म्हटले होते की कात्रज घाटात लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी पोलिसी वाहनातून खाली उतरले. नंतर ते आम्हाला धक्का देवून पळून गेले. नंतर तपासात पोलिसांनी बनाव रचून खोटी फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी कात्रज येथून पिंपरी मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपासासाठी हा गुन्हा पुन्हा पिंपरीकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान गुन्हे शाखा तपास करत असताना फरारी गुन्हेगार सापडले.

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी
फरार गुन्हेगारांना अटक केल्यावर तपासामध्ये त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. पिंपरी येथील माजी नगरसेवक कैलास कदम व अ‍ॅड. मंचरकर यांच्याशी राजकीय वैमनस्य आहे. यातूनच कदम यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या खुनाची सुपारी आम्हाला दिली होती, अशी कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर आणि अन्य दोघांना शुक्रवारी अटक केली. नंतर न्यायालयात हजर केले असता तिघांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.