माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना बेकायदा बांधकामाविषयी नोटीस

0

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना महापालिकेने बेकायदा बांधकामाची नोटीस बजावली आहे. तसेच 24 तासात बांधकाम स्वत:हून पाडावे, अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल आणि त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. तसेच फौजदारी खटला दाखल केला जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. दरम्यान, माझा ’बंगला’ 15 वर्षापूर्वीचा असून अधिकृत आहे. भाजपने प्रशासनामार्फत सुडाच्या भावनेतून मला नोटीस दिली आहे. प्रशासनाने कारवाई करून दाखवावी, असे खुले आव्हान जगताप यांनी दिले आहे.

वाढीव बांधकामाची परवानगी नाही
राजेंद्र जगताप यांचा पिंपळेगुरव येथे बंगला आहे. ’बंगला’ अधिकृत आहे. परंतु, त्यावर वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. वाढीव बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेतली नाही. त्यामुळे बांधकाम काढून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी सांगितले. बेकादेशीर बांधकाम काढून टाकण्याची पालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने जगताप यांना शनिवारी (दि.18) नोटीस बजावली आहे.

माझा ’बंगला’ अधिकृत असून 15 वर्षापूर्वीचा आहे. 400 ते 500 फूट वाढीव बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे तयार केली आहेत. पालिकेकडे सादर करणार आहे. मात्र, भाजपने प्रशासनामार्फत सूडाच्या भावनेतून मला बेकायदा बांधकामाची नोटीस दिली आहे. पालिकेने माझे बांधकाम पाडून दाखवावेच, असे खुले आव्हानच जगताप यांनी दिले आहे. तसेच बांधकाम पाडल्यावर ’पुढे काय करायचे ते मी बघून घेतो’.
-राजेंद्र जगताप

भाजपचा कारभार चुकीचा
पिंपळेगुरव परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यापैकी पालिकेने किती बांधकामांना नोटीसा दिल्या आहेत. अनेक नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे आहेत. ग्रीन झोन, पुररेषेमध्ये बेकायदेशीर बांधकामे केली गेली आहेत. त्यांना तर 2012 मध्येच नोटीसा दिल्या आहेत. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. लोकांची फसवणूक केली जात असून शास्तीकराबाबत जनतेची दिशाभूल करण्यात आली, असेही जगताप ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.

राष्ट्रवादी ते भाजप, पुन्हा राष्ट्रवादी
दरम्यान, राजेंद्र जगताप 2012 ते 2017 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून पालिकेची निवडणूक लढले. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. जवळच्या लोकांनी दगाफटका केल्यामुळे पराभव झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पुन्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.