माजी नगरसेवक संतोष पाटलांच्या घरावर तरुणाच्या दगडफेकीने तणाव

0

अंगणातील बोकडाचाही घेतला जीव ; तालुका पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात

जळगाव – मनसेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या राहत्या घरावर एका तरुणाने जोरदार दगडफेक करीत नुकसान केल्याने संतोषआप्पानगरा घटना सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीनंतर तरुणाने अंगणातील बोकडाचाही मारहाण करीत जीव घेतला. शिवाजी जमदाडे रा.जळगाव असे तरुणाचे नाव असून त्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीच्या परवानगीसाठी आणले असता न्यायालय आवारात तसेच जिल्हा रुग्णालयातही तरुणाने आरडाओरड तसेच शिवीगाळ करुन गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे.

सोमवारी संतोष पाटील यांच्या घराबाहेर शिवाजी जमदाडे हा तरुण कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ, आरडाओरड करत होता. यादरम्यान त्याने अचानक संतोष पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात घराच्या काचा फुटून नुकसान झाल्याने संतोष पाटील यांच्यासह घरातील महिला घराबाहेर आल्या. शिवाजीने येथील एका लहान मुलालाही मारहाण करत बोकडलाही मारहाण केली. तरुणाच्या मारहाणीत बोकडाचा जीव गेला.

पोलीस अधिकार्‍यांना कळविला प्रकार
गेल्या दीड महिन्यापूर्वी संतोष पाटील यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याचप्रकारे हा तरुण हल्ला करण्यासाठी आला असावा अशी शंका आल्याने संतोष पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना माहिती दिली. अधिकार्‍यांनी तत्काळ तालुका पोलिसांना तरुणाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक तसेच कर्मचार्‍यांनी तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी संतोष पाटील यांचे पूत्र दिपक यांना विचारला असता त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना विचारणा केली असता, याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.

न्यायालय, जिल्हा रुग्णालयातही गोंधळ
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक तडवी यांनी शिवाजीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी जिल्हा न्यायालयात आणले. या परिसरातही तरुणाने आरडाओरड, शिवीगाळ करत गोंधळ घातला. परवानगी मिळाल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी शिवाजी गोंधळ घातल होता.