माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण गोत्यात

0

ठाणे । बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणातील आरोपी तथा माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अधिकृत उत्पन्नापेक्षा 40.99 टक्के जादा संपत्ती बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह पत्नी सुलेखा चव्हाण यांच्यावर विशेष तपास पथकाने आज (गुरुवार) सकाळी हा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे महापालिकेत 1992 ते 2015 या काळात नगरसेवक असताना त्यांनी आपल्या शिवाईनगर येथील बंगल्यासह 10 कोटी 96 लाख 502 रुपये किमतीची अपसंपदा जमवल्याचे तपासात समोर आले आहे. हा गुन्हा दाखल करण्याआधी पोलिसांनी त्यांच्या विविध मालमत्तांची माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. या आधी अशाच प्रकारचा अपसंपदेचा गुन्हा काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यावर ही दाखल करण्यात आला होता.

सूरज परमार या बांधकाम व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून त्यात चार नगरसेवकांची नावे लिहून ठेवली होती. नावे खोडली गेल्याने त्याचा तपास फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर याबाबत आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि भ्रष्टाचाराच्या कलमानुसार हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष एसआयटीची ही नियुक्ती करण्यात आली होती. याच तपासात चारही आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आलेली होती. त्याच्याच आधारे आता हा नवीन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आधी याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान सुधाकर चव्हाण यांच्या येऊर येथील बंगल्यावर 50 हजारांचे विदेशी मद्य सापडल्याचादेखील गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.

कोड लँग्वेजमध्ये नावे
सूरज परमार यांच्या आत्महत्येचा गुन्हा हा कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदविला असला तरी त्याचा तपास सुरुवातीपासून विशेष शोध पथक करत होते. याच तपासात आयकर विभागाने 2014 साली धाड घालून जप्त केलेल्या कागदपत्रांनी ठाण्यात मोठी खळबळ माजवली होती. त्यात अनेक राजकीय नेत्यांची नावे सूरज परमार यांनी कोडमध्ये लिहून ठेवली होती.