माजी नगराध्यक्षांच्या निवेदनाची उर्जा मंत्र्यांकडून दखल : बेरोजगारांना दीपनगरात रोजगाराची आस

भुसावळ : भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश कालिदास नेमाडे यांनी उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना लेखी निवेदन पाठवून दीपनगर 660 प्रकल्पात भुसावळ शहर तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या लाटेमुळे नाशिक, पुणे, मुंबईत गेलेल्या तरुणांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून स्थानिक स्तरावर बेरोजगार युवकांना काम मिळाल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांच्या हिताचे होणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

नवीन प्रकल्पात कामाची आशा
नेमाडे यांच्या पत्रानुसार, कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामुळे भुसाळसह परीसरातील अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. यात स्थानिक पातळीसह बाहेर गेलेल्यांचा रोजगार हिरावण्यात आलेला आहे. यामुळे दीपनगर येथे सुरू असलेल्या 660 मेगावॅट क्षमतेच्या नवीन प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे. या अनुषंगाने उर्जा खात्याकडून उमेश नेमाडे यांना नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. यात नेमाडे यांनी मागणी केल्यानुसार दीपनगरच्या प्रकल्पात यापुढे स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नमूद केले. हे पत्र दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे.