कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्ष सोडणार : माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या भेटीला अजित पवार निघाले
मुक्ताईनगर : तब्बल 42 वर्षांपासून भाजपा पक्ष वाढीसाठी खस्ता खाणार्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आल्याने खडसे समर्थकांसह लेवा समाज राज्यात संतप्त झाला आहे. खडसेंनी आता पक्ष सोडावा या निर्णयापर्यंत कार्यकर्ते पोहोचले आहेत तर खडसेंनी मात्र अद्याप याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या भेटीसाठी गुरुवारी येत असल्याचे वृत्त आहे. खडसे व पवार यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा व निर्णय होतो? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
तर राज्यात बदलतील समीकरणे?
खडसेंनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राज्यात समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे भाजपाच्या विद्यमान आमदारांसह उमेदवारांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडसे हे भाजपाचे वजनदार नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्गही समाजात आहे. खडसे पक्ष सोडणार वा नाही? हे सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
मुलीला उमेदवारी, राज्यपालपदाची संधी?
खडसेंऐवजी त्यांची कन्या अॅड.रोहिणी यांना भाजपाने उमेदवारी देवू केली आहे शिवाय खडसेंना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे मात्र मात्र खडसेंनी या सर्व ऑफर नाकारल्याचेही समजते. खडसे समर्थकांनी मात्र आम्हाला नाथाभाऊच विधानसभेत हवे, असा आग्रह धरला आहे.