खडसेंचा पक्षांतराचा इशारा !

0

अन्याय सुरुच राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल

जळगाव – पक्षात जाणीवपूर्वक काही लोक मला अपमानित करीत आहे. निर्णय प्रक्रियेपासून बाजुला ठेवले जात आहे. कोअर कमेटितुनहि काढण्यात आले. मी आजही पक्षाचे काम करायला तयार आहे. पण केलेल्या कामाची नोंदच जर घेतली जात नसेल आणि अन्याय सुरुच राहत असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पक्षांतराचा इशारा पत्रकारांशी बोलतांना दिला.

जळगाव शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन येथे भाजपाची विभागीय बैठक आज पार पडली. या बैठकिनंतर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, अ‍ॅड. रोहिणी खडसे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अशा तिघांची बंद दरवाजाआड चर्चा झाली. या चर्चेनंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी मुक्ताईनगर येथे झालेल्या निवडणुकीतील पराभव व संदर्भात चर्चा झाली आहे. पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी पक्षविरोधी काम केले. ज्यांनी पक्षविरोधी काम केले त्यांच्या संदर्भातील संभाषण क्लिप, कागदपत्र व आवश्यक ते पुरावे दिले प्रदेशाध्यक्षांना आहे प्रदेशाध्यक्षांनी शांतपणे ऐकून घेतले. मी त्यांच्याकडे नावे जाहीर करण्याची परवानगी मागितली. परंतु हा पक्षांतर्गत विषय असून जाहीर बोलल्यास पक्षशिस्तीचा भंग होतो. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आवश्यकता पडल्यास तुम्हाला देखील बोलावले जाईल. पक्षाच्या वरीष्ठांना कारवाई करण्याबाबत विनंती केली जाईल असे त्यांनी सांगितले. पुरावे पाहून प्रदेशाध्यक्ष समाधानी असल्याचे खडसे यांनी सांगितले.

ओबीसींवर अन्याय झाल्याचे म्हटले नाही, त्या कार्यकर्त्यांच्या भावना

ओबीसी विधानासंदर्भात खुलासा करतांना माजी मंत्री खडसे यांनी सांगितले की, मी कधीही ओबीसींवर अन्याय झाला असे म्हटले नाही. ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. कार्यकर्ते आजही माझ्याशी बोलतांना हा विषय काढत असतात. पक्षाचे लक्ष कार्यकर्त्यांनी वेधले आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिनीधींच्या भावना पोहचविण्याचे काम मी केले. मला कुठल्याही जातीवर बोलायचे नाही. जे घडलं आहे ते समोर आले पाहीजे. भाजपाचा चेहरा बदलविण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, स्वत: मी अशा अनेक लोकांनी या पक्षासाठी रात्रंदिवस काम केले आहे. ज्या पक्षाचे दोन खासदार होते त्या पक्षाला सत्तेत बसविण्यात ओबीसींची मेहनत होती. पक्षाने मला खुप दिले आहे. पण चाळीस वर्ष काम केल्यानंतर चार दिवसात बदनामी देखिल केली आहे. माझ्यावर कारवाई का केली? मुंडे साहेबांवरही अन्याय झाला होता. मी स्पर्धेत येऊच नये यासाठी जाणीवपुर्वक मला बाजूला केले जात आहे. काही लोक माझा सातत्याने अपमान करीत आहे. मग यांची काय आरती ओवाळायची काय? असा प्रश्न त्यांनी केला.

शेवटी मी देखील माणूस आहे, देव नाही

पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनात येत नाही. मला आता कोअर गृपमधुन काढले. निर्णय प्रकियेपासून दुर ठेवले जात आहे. शेवटी मी देखिल माणूस आहे, देव नाही. मी काय केले पाहीजे असे राज्यातील कार्यकर्त्यांना विचारले आहे. जाणीवपूर्वक काही लोकांकडून माझा अपमान होत असेल आणि सातत्याने असा अन्याय सुरूच राहीला तर मला वेगळा विचार करावा लागेल असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा इशारा दिला.

दोषींवर कारवाई होईल

विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार पराभूत होण्यामागे पक्षातीलच काहीजण कारणीभूत असल्याचा मुद्दा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आक्रमकपणे लावून धरलेला असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, एकनाथराव खडेस यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्यात आले आहे. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या असतील त्यांची पक्ष योग्य दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करेल असे आश्‍वासन खडसेंना देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली.