जिल्ह्यात लवकरच होणार प्रवेश सोहळा ; प्रदेशाध्यक्षांनी केले स्वागत
मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मो.हुसेन खान (आमीर साहब) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये गुरूवारी प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. लवकरच ते जिल्ह्यात प्रवेशोत्सव सोहळा होणार असून यात शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमीर साहब यांनी भाजपा सरकारविरुद्ध जाहीररीत्या नाराजी व्यक्त करून पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते ते आता प्रत्यक्षात खरे ठरले आहेत.
यांची होती उपस्थिती
मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयात झालेल्या आमीर साहब यांच्या काँग्रेस प्रवेशोत्ससोहळ्याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील, मुंबई अमन कमेटीचे चेअरमन फरीद शेख, व्हा.चेअरमन जरार कुरेशी, मिल्ली कॉन्सीलचे मुफ्ती अब्दुल रहेमान, इकबाल काझी, अब्दुल रहिम काझी, जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मुन्वर खान, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, आसीफ खान, जाकीर बागवान आदींची उपस्थिती होती.