रावेर लोकसभा निवडणुकीत योग्य वेळी भूमिका जाहीर करणार -अंजली दमानिया
रावेर- माजी मंत्री एकनाथराव खडसे बदनामी खटला प्रकरणी रावेर न्यायालयाने अंजली दमानिया यांना जामीन मंजूर केला तर खटल्याचे फिर्यादी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांचे वकील सी.जी.पाटील हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने एक हजार रुपये प्रवास खर्चापोटी दमानिया यांना देण्याचे आदेश दिले. दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडलेल्या दमानिया यांच्याशी प्रसिद्धी माध्यमांनी संवाद साधल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत ‘सही समय पर सटीक झटका दूंगी’ असे वक्तव्य त्यांनी करीत अधिक बोलण्याचे टाळले.
दमानिया यांना जामीन मंजूर
अंजली दमानिया यांना सोमवारी रावेर न्यायालयाने जामिन मंजूर केला. जळगावचे हितेंद्र कांतीलाल शहा यांनी त्यांना जामीन दिला. फिर्यादीचे वकील न्यायालयात उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून दमानिया यांचे वकील अॅड.सुधीर कुलकर्णी यांनी जोरदार आक्षेप घेत खर्चाची मागणी केल्यानंतर न्यायालयाने एक हजार रुपये फिर्यादी यांनी दमानिया यांना देण्याचे आदेश दिले. दमानिया यांच्यातर्फे अॅड.जे.जी.पाटील, अॅड.सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले तर फिर्यादी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्यातर्फे अॅड.तुषार महाजन यांनी युक्तीवाद केला.