मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी तारखेवर हजेरी लावली तर तारखेवर वारंवार गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून आप पक्षाच्या प्रीती मेनन यांना 50 हजाराचा जामीनपात्र वारंट न्यायालयाने काढले असून या खटल्याची पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे.
पुढील सुनावणीकडे लागले लक्ष
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर खोटे आरोप करीत भारतीय जनता पक्षाची बदनामी बदनामी केली म्हणून भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात भादंवि कलम 499, 500 प्रमाणे फौजदारी खटला नं. 165/16 दाखल केला होता. हा बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर 29 सप्टेंबर 2018 रोजी न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर शुक्रवार, 12 ऑक्टोबर रोजी या खटल्याच्या कामकाजात न्यायालयाने अंजली दमानिया यांचा खटला रद्द करण्याबाबतचा अर्ज फेटाळला होता. अंजली दमानिया व आपच्या प्रीती शर्मा मेनन हे खटल्याच्या सुनावणीत कामी न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुध्द 30 हजार रुपयांचा जामीन पात्र वॉरंट न्यायालयाने जारी केला होता. या बाबत दमानिया यांनी न्यायालयात तारखेवर हजर राहण्याचे बॉण्ड पोलिसांकडे सादर केले तर प्रीती मेनन यांना न्यायालयाने 50 हजाराचे जामीनपात्र वारंट काढल्याचे सूत्रांनी सांगितले.