माजी मंत्री खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे हल्ल्यातून बचावल्या ; वाहनाचे मात्र नुकसान
हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार : सूतगिरणीजवळील घटना
भुसावळ : हळद समारंभावरून मुक्ताईनगरकडे निघालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक अॅड.रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांनी लोखंडी आसारीने आघात करीत पलायन केले. ही संतापजनक घटना सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहराजवळील सुतगिरणीजवळ घडली. या प्रकाराने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. श्री संत गजानन महाराज नगरातील अॅड.खडसे यांच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त जमले आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची पडली होती ठिणगी
गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी शिवसेना पदाधिकार्याने गैरवर्तणूक केल्याच्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राष्ट्रवादीने या प्रकारानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते तर शिवसेना पदाधिकार्यांनी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर मुक्ताईनगरात फेसबुकवरील कॉमेंटच्या माध्यमातून झालेल्या वादात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांना पोलिसांनी अटकदेखील केली होती.
चोपण्याच्या वक्तव्यामुळे अॅड.रोहिणी खडसे आल्या चर्चेत
अॅड.रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना चोपण्याची भाषा केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. रविवारी भुसावळ विभागात अॅड.रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा शिवसेना पदाधिकार्यांनी जोरदार निषेध नोंदवत ठिकठिकाणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदनही दिले होते. ही सर्व घटना ताजी असतानाच अॅड.खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताने दगडफेक करून हल्ला केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अज्ञातांनी चढवलेला वाहनावर हल्ला
समजलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अॅड.रोहिणी खडसे या एका हळद समारंभावरून हजेरी लावून मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या वाहन (एम.एच. 19 सी.सी.1919) ला ओव्हरटेक करून एक दुचाकी आल्यानंतर वाहनचालकाने वाहनाचा वेग कमी करताच पाठीमागून पुन्हा दोन दुचाकीस्वार आले व त्यांनी आपल्याकडे लोखंडी आसारीने वाहनाच्या दर्शनी भागावर हल्ला केला. काही कळण्याआत हल्लेखोर पसार झाले. हल्ला घडला तेव्हा कारमध्ये अॅड.रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होते. या हल्ल्यात अॅड.रोहिणी खडसे व अन्य दोघांना काही दुखापत झाली नसलीतरी अचानक घडलेल्या घटनेने थरकाप उडाला. हल्लेखोर हे संख्येने सहा होते व ते लागलीच दुचाकीवरून पसार झाल्याचे समजते.