माजी मंत्री गणेश नाईकांच्या पुन्हा भाजप प्रवेशाच्या वावड्या

0

नेरुळ । वाशीमधील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे शुक्रवार 9 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याआधी पुन्हा एकदा नाईक यांच्या भाजपप्रवेशाच्या वावड्या उठू लागल्या आहे. या मेळाव्यात नाईक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने बावखळेश्‍वर मंदिर 28 डिसेंबरपर्यंत जमीनदोस्त करून उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश एमआयडीसीला दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच नाईक यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या सततच्या उठणार्‍या वावड्या यावरही ते बोलण्याची दाट शक्यता आहे.

मागील 30 मे रोजी झालेल्या मेळाव्यात गणेश नाईक कुठला राजकीय भूकंप करतील अशा वावड्या संपूर्ण नवी मुंबईत उठल्या होत्या. मात्र, मागील मेळाव्यात गणेश नाईक यांनी राजकीय भाष्य न करता उलट आध्यात्मिक भाषणावर जोर दिल्याने नवी मुंबईतील राजकीय चर्चांना खीळ बसली. मात्र, आता या मेळाव्यात बावखळेश्‍वर मंदिराबाबत काही निर्णय नाईक घेणार का? आणि तशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना देणार का? का आणखी काही नवीन राजकीय भूकंप घडवणार, याकडे सर्व नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा उलगडा होण्याची शक्यता
नवी मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर जयवंत सुतार आणि आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. काही दिवसांपासून गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीतील माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याबाबतची उत्तरे बहुधा कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करावयाची असेल, तरच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी गणेश नाईक काय घोषणा करतात, याची विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.