जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झालेले माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, विजय वाणी यांच्यासह 32 जणांची नाशिक कारागृहातून सुटका झाली आहे. दरम्यान, यातील 18 जणांनी न्यायालयात पासपोर्ट जमा केले असून उर्वरित आरोपींच्या नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान धुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या पाचही गुन्हेगारांचे बुधवारी डिचार्ज झाला असून त्यांना धुळे कारागृह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्या. के.के.सोनवणे यांच्या खंडपीठाने 4 रोजी बमाजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 35 जणांना प्रत्येकी 1 लाख रुपये पीआर बॉन्ड व सालवंशी जामीन मंजूर केला. यादरम्यान सर्वांना पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुनंदा रमेश चांदोलकर व अरुण नारायण शिरसाळे यांनी बुधवारी प्रत्येकी एक लाखाचा जातमुचलका धुळे न्यायालयात सादर केला. त्यानंतर त्यांच्याही सुटकेचे आदेश न्यायालयाने दिले. घरकूल प्रकरणाचा निकाल लागल्यापासून वैद्यकीय कारण समोर करत लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे हे उपचारार्थ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होते. त्यांनाही डिचार्ज घेतला असून धुळे कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्हेगारांबाबत खंडपीठाने माहिती मागविली होती ती माहिती खंडपीठाला पाठविण्यात आल्याचे धुळे वैद्यकीय महाविद्यालायचे सुप्रिटेंन्डंन्ट डॉ. भूषण राव यांनी सांगितले.