माजी मंत्री नितीन राऊत यांचा प्रबुद्धरत्न पुरस्काराने सन्मान

0

देहूरोड : देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सोमवारी आंबेडरकरी जनतेचा जनसागर लोटला होता. यावेळी विविध संस्था, संघटना आणि राजकिय पक्षांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुध्दविहार कृती समिती, बुध्दविहार ट्रस्ट आणि धम्मभूमी सुरक्षा समितीच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

विविध व्यक्तिंना पुरस्कार
देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा 63 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा प्रबुध्दरत्न पुरस्कार माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना प्रदान करण्यात आला. तसेच यामध्ये सत्यशोधक समाजचे डी. एस. नरसिंगे (धम्मरत्न), बडोद्याच्या संकल्पभूमीचे मितेश एस. परमार (क्रांतीरत्न), आंबेडकर व्हॉईस या बंगळुरू येथुन प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाचे संपादक के. चंद्रशेखर (साहित्यरत्न), महाराष्ट्रातील शिक्षक नेते अंबादास शिंदे (भीमरत्न) आणि उद्योगपती अविचल धिवार (उद्योगरत्न) यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी सामाजिक न्यय मंत्री चंद्रकांत हंडोरे, बुध्द विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, बुध्दविहार ट्रस्टचे अ‍ॅड. गुलाबराव चोपडे, गोपाल तंतरपाळे, देहूरोडचे उफविभअगीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरूण मोरे, धम्मभूमी सुरक्षा समितीचे अशोक गायकवाड, विजय लोखंडे, बापूसाहेब गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे तसेच महिला समितीच्या संगिता वाघमारे, मंदाकिनी भोसले, रंजना चव्हाण आदी उपस्थित होते.

वैदर्भिय भीमसैनिकांची धम्मयात्रा
सकाळी आठ वाजता वैदर्भिय भीमसैनिकांनी शहरातून धम्मयात्रा काढली. पंचशील ध्वजारोहन, बुध्दवंदना आदी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी मातंग धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय भेगडे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, राहुल बालघरे, सारिका नाईकनवरे यांनी सकाळी येथे अभिवादन केले. नागपूरचे भन्ते ज्ञानज्योती यांनी प्रवचन दिले. त्यानंतर पुरस्काराचा मुख्य सोहळा संपन्न झाला. सायंकाळी भीमगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम झाला.

बौद्ध साहित्याची मोठी खरेदी
भारिप बहुजन महासंघ आणि बुध्दविहार ट्रस्ट तसेच भारतीय बौध्द महासभा आणि समता सैनिक दलाच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने मोफत वैद्यकिय सेवा पुरविण्यात आली. विविध संस्थांच्यावतीने अन्नदान करण्यात आले. पुस्तके, बौध्द साहित्य तसेच विविध गृहोपयोगी साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. पोलीसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.