भुसावळातील माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 10 माजी नगरसेवक अखेर अपात्र

जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या निकालाने खळबळ : माजी मंत्री एकनाथराव खडसेंना धक्का

10 ex-corporators including former elected mayor of Bhusawal finally disqualified भुसावळ : भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवार, 18 रोजी एका टर्मसाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवल्याने भुसावळातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे तर या निकालाने भुसावळातील आगामी निवडणुकीत मोठी राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळ नगरपालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले मात्र त्यांनी 29 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 17 डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. नियमानुसार भाजपातून बाहेर पडताना राजीनामा देणे अपेक्षित होते मात्र तसे न करता पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व त्यामुळे दाखल याचिका जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर करीत वरील नगरसेवकांना एका कार्यकाळासाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड.राजेंद्र रॉय यांनी काम पाहिले.

अखेर माजी नगरसेवक एका कार्यकाळासाठी ठरले अपात्र
पक्षांतर कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. अनेकदा या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्य केला. दरम्यान, खडसे यांच्यासाठी व त्यांच्या गटासाठी हा मोठा धक्का असून आगामी काळात भुसावळातील राजकारणात यामुळे अंतर्गत कुरघोड्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

तर शिक्षा भोगायला आम्ही तयार : प्रा.सुनील नेवे
माजी मंत्री एकनाथराव खडसेंसोबत आम्ही सर्व जण गेलो हा जर गुन्हा असेल तर त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत, असे माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे म्हणाले. राजकीय दबावाखाली हा अपात्रतेचा निर्णय देण्यात आला आहे. आम्ही त्या विरोधात राज्य सरकारकडे व उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आमच्याकडे सर्व ऑप्शन उघड असून म्हणून अशा प्रकारांना आम्ही बळी पडणार नाही, ज्या लोकप्रतिनिधींनी भरभरून मदत केली, मतदान केले त्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई करणे म्हणजे त्यांचे राजकीय करीयर उद्ध्वस्त करणे आहे व हे पाप ज्यांनी केले आहे, जनताच आता त्यांना धडा शिकवेल, असेही प्रा.नेवे म्हणाले.

आगामी काळात शहरात राजकीय संघर्ष
भुसावळातील माजी नगरसेवकांच्या अपात्रतेनंतर राजकीय गोटात खळबळ उडण्यासोबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आतापर्यंत आमदार संजय सावकारे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणारे सर्वच नगरसेवक होते मात्र आता खडसे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना एक टर्म अपात्र ठरवण्यात आल्याच्या निर्णयामुळे माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणुकीतही हा संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.