प्रभाग 11 मधील नागरिकांची नाराजी ः खड्डेमय रस्ते, फुटलेल्या गटारींचा करावा लागतोय सामना
जळगाव– खड्डेमय रस्ते तर काही अनेक वर्ष लोटूनही रस्तेही झालेले नाहीत. गटारी नाहीत, ज्या आहेत त्याचीही नियमित साफसफाई होत नाही, त्यामुळे गटारींचे पाणी रस्त्यावर येवून अस्वच्छता पसरली आहे. घंटागाडी पाच ते आठ दिवसाआड येते. त्यामुळे कचरा घरातच साठवून ठेवावो लागतो. कचरा कुंड्या नाहीत, पथदिव्यांमुळे ठिकठिकाणी अंधार पसरला आहे, मोकळ्या मैदानांवर झाडेझुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा एक ना एक समस्यांचा कर भरुनही सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे माजी महापौर ललीत कोल्हे यांचा प्रभाग आहे.
मुलभुत सुविधा मिळेना? इतर सुविधा काय मागणार
प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोल्हेनगर, विद्युत कॉलनी, भगवाननगर,मुंदडानगर, शास्त्रीनगर, विवेकानंदनगर, यशवंतनगर, हरिविठ्ठल नगर, व्यंकटेशनगर, श्रीधर नगर या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात जनशक्तिच्या टीमने पाहणी करुन समस्या तसेच नागरिकांची अपेक्षा काय हे जाणून घेतले. काही प्रभागांमध्ये बर्यापैकी नागरिकांना मुलभूत सुविधा आहेत. मात्र काही भागांमध्ये अद्यापही आहे तीच परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षामध्ये वस्त्या वाढल्या. मात्र सुविधा आहेत तेवढ्याच आहे. नागरिकांना गटारी नाहीत, रस्ते नाही, अशा एक ना एक समस्यांचा सामना करावा लागतोय. मुलभूत सुविधाच मिळत नसतील तर इतर सुविधा काय मागणार असा संतप्त सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला.
नियमित स्वच्छताही होईना
या प्रभागामध्ये घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा घरातच साठवून ठेवावो लागतो. उघड्यावर टाकता येत नाही. काही ठिकाणी कचराकुंड्या असून तीही कचर्याने ओसंडून वाहत आहे. तिच्यातील कचरा उचलला जात नाही. घरात कचरा साठवला की, साहजिकच त्याला दुर्गंधी सुटते. मोकळ्या जागांवर झाडेझुडपे वाढली आहे, त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात डेंग्यूची साथ सुरु असतांना महापालिकेकडून कुठलीह फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे लहान मुलांना बाहेर पाठविता येत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन महिलांनी लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला.
पोलिसांची गस्त नसल्याने सुरक्षा रामभरोसे
या प्रभागात काही ठिकाणी पथदिवे आहेत. काही ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधार पसरला आहे. लोकप्रतिनिधि नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहे, मात्र नुसते खांब उभे आहे, त्यावर पथदिवे नाहीत. पथदिवे नसल्याने प्रचंड अंधार असतो, तर दुसरीकडे पोलिसांची नियमित गस्त होत नाही, त्यामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. एकीकडे सुविधा नाही तर दुसरीकडे पोलिसांची गस्त नसल्याने आम्ही खेड्यात राहतो की काय? असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित करुन नाराजी व्यक्त केली.
खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास
रस्ते नाहीत जे आहेत तेही रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते आहेत हे कळत नाही. अशा खराब रस्त्यावरुन सायकल चालिवता येत, सायकलच काय पण पायी सुध्दा चालता येत नाही, त्यामुळे खडतर प्रवास करावा लागतो, अशा प्रतिक्रिया येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. रस्ता खराब आहे, तो दुरूस्त करावा, तसेच आम्हाला खेळण्यासाठी मैदान नाही, उद्यान नाही. त्यामुळे आम्ही खेळायचे कुठे? आम्हाला खेळण्याचा अधिकार नाही का? असा केविलवाणा प्रश्न चिमुकल्यांनी उपस्थित केला. पथदिवे नसल्याने कुटुंबीय घराबाहेर खेळण्यास जावू देत नाही त्यामुळे लाईटही लावून द्यावेत, मैदाने नसले तरी चालेल मात्र ज्या जागांवर गवत वाढले आहे, त्याठिकाणी साफसफाई करुन त्याठिकाणी फवारणी करावी, म्हणजे ते खेळण्यायोग्य होईल, अशी माफक अपेक्षाही चिमुकल्यांनी व्यक्त केली.