हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पुणे : पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या 42 वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी रात्री खराडी येथील राइजिंग रुग्णालयात दाखल केले होते. सकाळपासून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा आणि मुलगी, सासू आणि सासरे असा परिवार आहे. कोद्रे यांच्या पार्थिवावर सायंकाळी मुंढव्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अल्पावधीत उमटविला कामाचा ठसा
पुणे महानगरपालिकेत 2012 मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत त्यांनी पुणे महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले. दुसर्यांदा नगरसेविका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महापौरपद दिले होते. त्यांनी कमी कालावधीत कामाचा ठसा उमटवला होता. हसमुख असणार्या कोद्रे यांनी सभागृहात विविध विषय मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करण्याचे काम नेहमी केले. सामाजिक कामांमध्येही त्या अग्रेसर होत्या. सोमवारी सकाळपासून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुंढवा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.