** सत्ताधारी मुलभूत सुविधा देवू शकले नसल्याचा आरोप डॉ. राधेश्याम चौधरींचा आरोप
** रोटरी वेस्टतर्फे ’माझं जळगाव माझी भूमिका’ चर्चासत्राचे आयोजन
जळगाव । रोटरी वेस्टतर्फे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमींवर ’माझं जळगाव माझी भूमिका’ या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत सर्व पक्षीय नेत्यांना बोलविण्यात आले होते. या चर्चासत्रांत उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तरे देतांना माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी माझ्या मिटींग आहेत असे म्हणत काढता पाय घेतला. या चर्चासत्रांत भारतीय जनता पार्टीतर्फे आ. राजुमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेतर्फे माजी महापौर नितीन लढ्ढा व काँग्रेसतर्फे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी रोटरी अध्यक्षा संगिता पाटील, सचिव राजेश परदेशी, चर्चासत्र प्रमुख गनी मेमन उपस्थित होते.
लोकसहभागातून काम करणे लाजीरवाणे
डॉ.राधेश्याम चौधरी यांनी आपले मत मांडतांना सांगितले की, महापालिकेतील सत्ताधार्यांनी मुलभुत सुविधा आधी पुरवायला हव्या होत्या. यानंतर विमानतळ वगैरे इतर प्रकल्प करायला हवे होते. शहराला वर्षभरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा होत असतांना पाणीपट्टी मात्र 365 दिवसांची वसुल केली जाते. शहरातील विकास कामे लोकसहभागातून करणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपाची केंद्र व राज्यात सत्ता असतांना ते आपले वजन वापरुन शहराचा विकास करु शकत होते. पण तसे त्यांनी केले नाही. सेना- भाजपाचे भांडण दिखावा असू शकतो. राजकारणात गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचे काम नेत्यांनी केल्याचा आरोप केला. आम्ही सत्तेत नसतांना शहरातील अनेक प्रश्न सोडविले असल्याचे सांगितले.
विकास कामांसाठी सत्तेची गरज नाही
यावेळी ना. गिरीश महाजन यांचा संदेश दाखविण्यात आला. यात ना. महाजन यांनी महापालिकेत सत्ता दिल्यास वर्ष भरात शहराचा विकास करू नाहीतर विधानसभेच्या निवडणूकीत मत मागायला येणार नाही असे सांगितले. यावर राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी विकास कामांसाठी सत्तेची गरज नसल्याचे सांगून भाजपा- सेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते मंत्री असतांना महापालिकेत त्यांची सत्ता नसतांना त्यांनी नाटयगृह आणि लांडोरखोरी उद्यान मंजुर करुन आणले असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले.
जातपात न पहाता चांगला उमेदवार निवडून द्या
आ.राजुमामा भोळे यांनी चर्चासत्रांत सबका साथ सबका विकास हे मोदींचे ब्रिादवाक्य घेवून विकास करणार आहे. शहरात मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी 25 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांकडुन मंजूर करुन आणले. पण सत्ताधारी खाविआने विकास कामे करतांना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात कमी कामे दिली नसल्याचा आरोप केला. शहरात अमृत योजना, भूमिगत गटार आदी योजना केंद्र सरकारच्या आणल्या आहेत. लोकांनी जातपात न पाहता चांगले उमेदवार निवडुन द्यावे असे आवाहन आ. भोळे यांनी केले. महापालिकेतील सत्ताधार्यांनी शहरातील गरिब जनतेचे अतिक्रमण काढले परंतू 17 मजलीला परवानगी नव्हती मग तीच्या अतिक्रमणाचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला. विमानतळाचा फायदा सामान्य नागरिकांना नाही परंतु विमानतळाचे कर्ज सामान्य नागरिकांच्या डोक्यावर आहे याकडे आ. भोळे यांनी लक्ष वेधले.
खोटे बोलून लोकप्रतिनिधींनी पैसा केला गोळा
नितीन लढ्ढा यांनी माहिती देतांना सन 2000 पर्यत पालिकेचा गाडा बरोबर चालत होता. 2001 ला ग्रहण लागले ते 21 महिने होते. परंतु, अद्याप सुटु शकले नाही. 2012 साली प्रशासनाबरोबर चर्चा होवून हुडकोचे 129 कोटी रुपयांचे कर्ज वन टाईम सेटलमेंट करुन 80 ते 90 कोटींमध्ये सर्व मिटणार होते. 2013 साली निवडणुक डोळ्यासमोर ठेवून गाळ्यांबाबत केलेला ठराव क्र. 1231 राज्य शासनावर दबाव टाकुन रद्द करण्यात आला. खोटे बोलुन लोकप्रतिनिधींनी व्यापार्यांकडुन पैसा गोळा केला. गाळेधारकांची दिशाभुल करण्यात आली. मनपाच्या गाळे प्रकरणी जे अध्यादेश आज शासन काढु शकते आहे ते अध्यादेश 2014 काढु शकत नव्हते का ? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. युतीसाठी आम्ही दोन पाऊले पुढे गेलो. पण युती झाली नाही. सेना राज्यात सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे आम्ही सुध्दा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातुन मोठा निधी आणु शकतो असे गर्भीत इशारा भाजपाला दिला.
हॉकर्स, गाळेधारकांचा रोष
चर्चासत्रा दरम्यान नागरिकांनी प्रश्न विचारले. यात खाविआने मनपात एमआयडिसीमध्ये सुविधा देवु शकणार नाही असा ठराव केला आहे याकडे लक्ष वेधले. तर 10 वर्षात असे काय घडले की 450 कोटी रुपये कर्ज जळगाव शहरातील नागरिकांवर लादले गेले. गाळयांबाबत सन 2008 ला ठराव केला गेला आणि नंतर सलग 18 ठराव करण्यात आले. आम्ही जळगाव सेाडून जायचे का ? असा प्रश्न विनोद जवाहारानी यांनी विचारला. हॉकर्स धोरणांवर युवकांनी माजी महापौरांना धारेवर धरताच त्यांनी निरुत्तर होवुन चर्चामध्येच सोडून बाहेर जाणे पसंत केले.