जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे यास गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सव्वा चार महिन्यांपासुन होते फरार
१६ जानेवारी 2020 रोजी रात्री गोरजाबाई जिमखाना येथे रात्री 08.30 वाजता व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सात जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल गुन्हयात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात कोल्हे हे चार महिन्यांपासुन फरार होते.
श्रद्धा कॉलनीतुन स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
बुधवारी ललित कोल्हे हे रामानंदनगर परिसरातील श्रद्धा कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रात्री एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्यासह पथकाने कोल्हे यांना ताब्यात घेतले.
खंडणीच्या रकमेसह कार, गुन्ह्यातील रिव्हॉल्वर हस्तगत करणे बाकी
कोल्हे यास गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हे याच्यावर यापूर्वीही शहरातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी ३ लाख ४४ हजार ७८५ रुपये ही खंडणी म्हणून घेतलेली रक्कम हस्तगत करणे आहे. महागडी कार व गुन्ह्यावेळीचे रिव्हॉल्वर चाकू तसेच दांडके ही हस्तगत करणे आहे. असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे अॅड स्वाती निकम यांनी केला. युक्तीवादाअंती न्या. ए.एस. शेख यांनी कोल्हे यास एक जूनपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयीन सर्व कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.