माजी रेल्वेमंत्र्यांनी कोरोनामुळे ठेवले स्वत: विलग

0

नवी दिल्ली : जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १३७ वर पोचली आहे. भाजपाचे माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मात्र यांनीही स्वत:ला विलग केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सुरेश प्रभू हे सेकंड शेर्पा बैठकीसाठी सौदी अरेबियाला गेले होते. ही बैठक १० मार्चला झाली होती. मात्र, आखाती देशांमधून भारतात कोरोनाने शिरकाव केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रभू यांनी विलग होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाची टेस्ट सुरुवातीला निगेटिव्ह आली तरीही नंतर कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. कामोठेमधील महिलेला विमानतळावर कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, नंतर १३ दिवसांनी तिला खोकला, ताप आल्याने पुन्हा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. अशाचप्रकारे देशभरातही रुग्ण सापडल्याने प्रभूंनी हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे 14 मार्चला त्रिवेंद्रममधील मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये बैठकीसाठी गेले होते. यावेळी या बैठकीला स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. मुरलीधरण हे सध्या केरळमधील त्रिवेंद्रममध्ये असून तेथेच त्यांनी विलगीकरण केले आहे.