नवी दिल्ली । भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पाकिस्तान जे दावे करत आहे त्यामध्ये किती सत्यता आहे याची पोलखोल त्यांच्याच माजी अधिकार्याने केली आहे. पाकिस्तानचे निवृत्त लेफ्टनंट जनरल अमजद शोएब यांनी कबूल केले आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून नाही तर इराणमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याची बनवेगिरी करण्यात आली. अधिकार्याच्या या खुलाशाचा वापर भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणाच्या पुढील सुनावणीवेळी करू शकतो.
पाकिस्तानने जाधव यांच्यावर हेरगिरी व दहशतवादाचा आरोप लावून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयातील पुढील सुनावणीत भारताला अमजद शोएब यांच्या विधानाचा वापर करता येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला दिलासा दिला आहे. कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर संस्था रॉसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. भारताने पाकिस्तानचा हा आरोप अमान्य केला आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. यानंतर भारताने लगेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. कुलभूषण जाधव हेर असल्याचे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी म्हटले. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. कुलभूषण जाधव वर्षभरापासून पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. कुलभूषण इराणमार्गे बलुचिस्तानात शिरले. त्यामुळे त्यांना 3 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली, असे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र, भारताने कायम कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले. कुलभूषण जाधव हे हेर नसून ते नौदलाचे माजी अधिकारी आहेत आणि आता त्यांचा व्यवसाय आहे, असे म्हणत पाकचा दावा खोडून काढला आहे.