माजी विजेत्या-उपविजेत्यांचे नशीब अजूनही रुसलेलेच

0

नवी दिल्ली । हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत केवळ दोनच संघ एकही विजय मिळवू शकलेले नाहीत. धक्कादायक बाब अशी की हे दोन्ही संघ दोन वेळा अंतिम फेरीत झुंजले आहेत. यात गत मोसमाचाही समावेश आहे. या दोन्ही संघांचे आव्हान अद्याप संपुष्टात आलेले नाही, पण एटीके आणि केरळा ब्लास्टर्स या दोन संघांसाठी नशिबाचे फासे आतापर्यंत तरी उलटेच पडले आहेत. त्यांच्यासाठी विजयाचा दुष्काळ आहेच, शिवाय त्यांना कसेबसे प्रत्येकी तीन गोल करता आले आहेत. दुसरीकडे एटीकेविरुद्ध सात, तर ब्लास्टर्सविरुद्ध सहा गोल झाले आहेत. गतविजेता एटीके गुणतालिकेत तळाला आहे, तर ब्लास्टर्सने आठवे स्थान मिळविले आहे. तीन सामने बरोबरीत सोडवल्यामुळे ब्लास्टर्सची स्थिती बरी आहे. यंदाच्या मोसमात सलामीचा सामना या दोन संघांमध्येच झाला होता आणि तो गोलशून्य बरोबरीत सुटला होता. या निकालाचा उल्लेख करणे उचित ठरेल.

दोन्ही संघांमध्ये एकच फरक ठळकपणे दिसून येतो आणि तो आहे खेळाची शैली. ब्लास्टर्सचा संघ आघाडी फळीमधून आक्रमण करतो. काही काळ बचाव केल्यानंतर वेगवान आक्रमण करण्याचे त्यांचे डावपेच असतात. दुसरीकडे एटीके संथपणे सामन्याला सुरुवात करतो. दोन वेळच्या विजेत्या एटीकेची यंदाच्या मोसमातील सुरुवात तरी अशीच आहे. येथे एक उल्लेख करावा लागेल की त्यांचे मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम नव्या पद्धतींचा अवलंब करीत आहेत. सर्वाधिक पासेसच्या क्रमवारीत एटीके चौथ्या फेरीनंतर पाचव्या स्थानावर घसरला आहे. गोलसमोरील संधींचे रूपांतर हा दोन्ही संघांसाठी चिंतेचा मुद्दा ठरला आहे. गोलच्या दिशेने मारलेल्या फटक्यांच्या संख्येचासुद्धा उल्लेख करावा लागेल. एटीकेने 41 फटेक मारताना केवळ तीन वेळा यश मिळविले आहे.ही टक्केवारी 7.3 इतकी निराशाजनक आहे. ब्लास्टर्सचा संघसु्द्धा केवळ 8.8 इतकीच टक्केवारी राखू शकला आहे. एटीकेकडे कलात्मक दर्जाची कमतरता नाही. त्यांच्या मध्य फळीची धुरा कॉनर थॉमस आणि बिपीन सिंग यांच्यावर आहे. पुरेशा संधी निर्माण करण्याइतकी भेदकता त्यांच्याकडे आहे. आघाडी फळीतील फिनलंडचा स्ट्रायकर नियाझी कुक्वी हा मात्र अचूकता राखू शकलेला नाही.