कर्जत । बालदिनाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून गावातील प्राथमिक शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाची भेट दिली आहे. त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळणार आहे. शाळेतील संगणक आणि इ लर्निंगची साधने पाहून सर्व चिंमुरड्यांच्या चेहर्यावर आनंद द्विगुणीत झाला होता. यात माजी विद्यार्थ्यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. इतरही भागातील तरुणांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. अनेक ग्रामीण भागात डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे कोदिवले शाळेतही विद्यार्थ्यांंना दर्जेदार शिक्षण मिळावे असे येथील शिक्षकांना वाटत होते.
या नाविन्यपूर्ण डिजिटल शाळेतून गुणवत्ता वाढीच्या प्रयत्नांना एक नवी दिशा व नवी झळाळी प्राप्त होणार आल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. या डिजिटल स्क्रीनमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंपर्यंत पोहचवला जाणार आहे. या स्क्रीनद्वारे विद्यार्थ्यांंना लाइव्ह अभ्यास पहायला व ऐकावयास मिळणार असल्याने विद्यार्थ्यासाठी तो कुतुहलाचा विषय बनला आहे. यामुळे अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता होण्यास मदत होईल असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. तसेच विद्यार्थ्यांंना देण्यात येणार्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे सर्वांनीच स्वागत केले असून या माजी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी योग्य ती मदत आणि शाळा डिजिटल करण्यात मदत केली तर भावी पिढीला चांगल्या दर्जाचे आणि उत्तम शिक्षण मिळेल. अशी भावना माजी विद्यार्थी भास्कर तरे यांनी व्यक्त केली.
फळ्याऐवजी डिजिटल स्क्रीन
गावातील तरुणांनी पुढाकार घेत शाळेला इ लर्निंग आणि संगणकाची भेट दिली. राजेंद्र सोनावळे, सुभाष सोनावले, अरविंद तरे, महेश तरे, भास्कर तरे, महेश तरे, केशव तरे, रमेश चहाड, रवींद्र तरे, पप्पू तरे, महेश अर्जुन तरे, अतिष सोनावले, प्रवीण मोरगे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांंना आता खडु आणि फळयाऐवजी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील. यावेळी केंद्र प्रमुख गजानन म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चव्हाण, नंदकुमार तरे, पांडुरंग तरे, संजय तरे, आदी उपस्थित होते.