माजी व्यवस्थापकाकडूनच झाली कंपनीत तेलचोरी

0

नवी मुंबई । तळोजा एमआयडीसीतील ऑटोटेक इंटरनॅशनल या तेल कंपनीतील तेलाची चोरी करणार्‍या त्रिकुटाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये याच कंपनीत पूर्वी मॅनेजर म्हणून काम करणार्‍या आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. या त्रिकुटाने गेल्या दीड वर्षांमध्ये कंपनीतील सव्वादोन लाख रुपये किमतीचे सुमारे 1400 लीटर तेल चोरल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुरक्षारक्षक सच्चिदानंद सिंग, संदीपकुमार पांडे आणि इम्रान इब्राहिम खान या तिघांचा समावेश असून यातील संदीपकुमार हा कंपनीत पूर्वी मॅनेजर म्हणून काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याने काम सोडले होते. त्याने दीड वर्षांपूर्वी सुरक्षारक्षक सच्चिदानंद सिंग याच्याशी हातमिळवणी करून तेलचोरीचे सत्र सुरू केले होते.

सुरक्षा रक्षकाशी हातमिळवणी करून केली चोरी
कंपनी बंद झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास संदीपकुमार हा इम्रान खान व त्याच्या सहकार्‍याला कंपनीमध्ये छोटा टेम्पोसह पाठवून मुख्य टाकीतील तेलाची चोरी करून ते विकत असे. तेलाची चोरी होत असल्याचा संशय कंपनीमालक देवेन्द्र सिंग यांना आल्यामुळे त्यांनी दोन महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षकाची बदली केली होती. त्यामुळे कंपनीत सच्चिदानंदच्या ऐवजी दुसरा सुरक्षारक्षक रात्रपाळीवर येत होता. त्यामुळे या सुरक्षा रक्षकाशी हातमिळवणी करून कंपनीतील तेल चोरी करण्याच्या प्रयत्नात संदीपकुमार पांडे होता. गेल्या महिन्यात संदीपकुमार हा इम्रानसोबत नव्या सुरक्षा रक्षकाला भेटण्यासाठी गेला होता. त्याचवेळी पाळत ठेवलेल्या कंपनीमालक देवेन्द्र सिंग यांनी संदीपकुमारला पकडून त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सच्चिदानंद याच्याशी हातमिळवणी करून तेलचोरी करत असल्याची कबुली दिली.