माजी सैनिकाचा हतबल संताप अन् गेंडाछाप प्रशासन

0

देशाची सेवा म्हणजे सर्वात मोठे कार्य, कोणताही जवान शहीद झाला तर देशातील नागरीकांमध्ये हळहळ व्यक्त होते. ठिकठिकाणी शहिद झालेल्या जवांनांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हे सर्व होतं जवान जिवंत नसतांना….मात्र माजी सैनिकांशी जिल्हा प्रशासन व कर्मचारी कसे संवेदनाशून्यपणे वागतात याचा प्रत्यय देणारा प्रसंग माझ्यासह सहकारी पत्रकार मित्रांना घडला.

सायंकाळची अंदाजे सव्वापाचची वेळ. मी आणि मित्र देशदूतचा अमोल कासार जिल्हाधिकारी कार्यालयात पार्कीगच्या आवारात पोहचलो. तेथे दिव्य मराठीचे सुधाकर जाधव, लोकमतचे विजय सैतवाल, तरूण भारतचे विष्णू मोरे आणि देशोन्नतीचे कृष्णा पाटील अगोदरच आमची वाट पाहत होते. त्याच वेळी एक माजी सैनिक तेथे गाडी घेण्यासाठी आला. गप्पा मारतांना कोण, कुणाच्या गाडीवर बसले होते याकडे आमचे लक्षच नव्हते, ते माजी सैनिक गाडीची डिक्की उघडत काहीतरी बडबडत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवत म्हणाले, “मला असं वाटत या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फाशी घेत आत्महत्या करावीशी वाटते”. ते असे बोलल्यानंतर आम्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले. काही कौटूंबिक कारण असेल असा विचार करून आम्ही पुन्हा गप्पांमध्ये रमलो. त्या जवानाने एक कागद डिक्कीत ठेवला आणि पुन्हा संताप व्यक्त करत ते बोलले, “मी अठरा वर्षे देशाची सेवा केली, माझे वडील वारले त्यावेळी मला वडीलांचे अंत्यदर्शनही झाले नाही. या प्रांत कार्यालयात महिनाभापासून एका दाखल्यासाठी फिरवताहेत, हरामखोर !!!”. ते असे बोलल्यानंतर काय झालं ?, असे आम्ही त्यांना विचारले.

त्यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले की, “ या हरामखोर कर्मचार्‍यांकडे दाखल्याची मागणी केली तर तुमचे प्रकरण अजून आमच्याकडे आले नाही, असे मोघम उत्तर मिळाले. मी परत त्यांना तपासणीसाठी विनवणी केली तर तुम्हाला प्रमाणपत्रासाठी 200 रूपये लागतील, असे बेमुर्वतखोरीचे उत्तर मिळाले. हे ऐकून मला संताप आला आणि सरळ नायब तहसिलदार मॅडमकडे गेल्यानंतर त्यांनी काही कागदपत्रे तपासल्यानंतर माझे प्रमाणपत्र दिले.”

बोलताबोलता ते इतके भावूक झाले की त्यांना रडू कोसळले !. पत्रकार मित्रांनी ही माहिती समजल्यावर तात्काळ इतर प्रश्‍नांची विचारणा करण्यास सुरूवातही केली. त्यावर माजी सैनिक बोलले की, “अहो जाऊ द्या ना, जे देशाची सेवा करणार्‍यांना अशी सेवा देत असतील तर सामान्य माणसांना किती सतावत असतील…, भरतील साले… !! , असेे धंदे करणारे हे हरामखोर भरतील, इथेच भरतील …!”, असे बोलताना त्यांना रडू कोसळले, नावागावची कोणतीच माहिती न सांगता सरळ बाईकला किक मारत ते तेथून निघून गेले. ज्यावेळी हा माजी सैनिक हुंदके देत रडू लागला त्यावेळी आम्हाला वाटले की काहीतरी गंभीर प्रश्‍न आहे. म्हणून आम्ही तात्काळ प्रांत कार्यालयात नायब तहसिलदार मॅडमची भेट घेत त्यांना विचारले. त्यांनी सांगितले की, “नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी त्यांच्या वडलांचा उत्पनाचा दाखला लागतो. मात्र त्यांचे वडील हयात नसल्यामुळे त्यांच्या वडलांचा मृत्यूचा दाखला आवश्यक होता, तो जोडला नव्हता. त्यांनी त्यांच्या वडलांचा उत्पनाचा दाखला जोडल्यामुळे गडबड झाली. त्यांनी त्यांच्या वडलांचा मृत्यूचे दाखला दाखविल्यांनतर लगेचच त्यांना प्रमाणपत्र दिले”.

ही माहिती घेऊन आम्ही निघून गेलो. माजी सैनिकाचा हुंदके देवून रडलेला चेहरा आमच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. आम्हाला त्या माजी सैनिकाच्या नावाची उत्सुकता लागली. कोण, कुठला, आता काय करतो; असे अनेक प्रश्‍न डोक्यात आले. त्यानंतर सकाळचे देविदास वाणी आणि पुण्यनगरीचे राजूभाऊ आले. त्यांना ही हकिकत सांगितल्यानंतर त्यांना प्रांत कार्यालयातून माजी सैनिकाचे नाव व पत्ता मिळवण्यास सांगितले. मग आज काही बातम्या नाही असे सांगून राजूभाऊ, वाणी, विष्णू व कृष्णा निघून गेले. मी, अमोल , सैतवाल आणि सुधाकर जाधव सोबतच होतो. शेवटी अमोलला पुन्हा प्रांत कार्यालयातून नाव मिळवण्यास सांगितले. अमोलने नायब तहसिलदार मॅडमकडे नावाचा आग्रह केला. त्यांनी प्रांताधिकार्‍याकडे जात हकिकत सांगितल्यानंतर प्रांताधिकार्‍यानी आम्हाला सांगितले की, याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही. माजी सैनिकाचे काही कागदपत्रांमुळे प्रमाणपत्र दिले नव्हते. येथे प्रमाणपत्रांसाठी कोणीही पैसे घेत नाही. मात्र तरीही चौकशी करतो असे आश्‍वासन दिलेे. त्यानंतर त्यांनी जवानाचे नाव सांगितले.

माजी सैनिक किशोर सुकदेव जाधव हा मुळचा भडगाव तालुक्यातील. वय साधारण 35-40 वर्षे. लष्करात 18 वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले. त्यांची माजी सैनिकाच्या कोट्यातून दुसर्‍या नोकरीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होती. त्यामुळे त्यांनी 6 मार्च रोजी प्रांताधिकारी कार्यालयात नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी कागदपत्रांसह वडलांचा उत्पन्नाचा दाखला जोडला होता. 27 मार्च पर्यंतच्या काळात त्यांनी प्रमाणपत्रासाठी अनेक फेर्‍या मारल्या. आपल्याला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळाले की दुसर्‍या नोकरीसाठी अर्ज करता येईल, अशी या माजी सैनिकाची धडपड सुरू होती. पण वेळेत प्रमाणपत्र मिळाले तरच अर्ज करता येणार होता, असे एकंदरीत त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते. त्यांची ही तडफड रात्री उशीरा घरी पोहचेपर्यंत माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हती.

– जितेद्र कोतवाल
9730576840