अहमदनगर : आधीचपासूनच संवेदनशिल मानले गेलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील शेवगाव शहरात माजी सैनिकासह पत्नी व त्यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले. शनिवारी रात्री घडलेली घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा प्रकार दरोड्याचा की खुनाचा याबाबत विविध तर्कवितर्क केले जात होते. पोलिसांनी दोन्हीही शक्यता गृहीत धरून तपासास सुरुवात केली होती.
आई वडिल आणि दोन्ही मुलांची हत्या
शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरात ही घटना घडली. अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 50), सुनंदा हरवणे (45), मुलगी स्नेहल (21) व मुलगा मकरंद (14) अशी मृतांची नावे आहेत. लष्करातून निवृत्त झालेले अप्पासाहेब हे भूमिअभिलेख कार्यालयात चौकीदार म्हणून काम करत होते. सकाळी दूधवाला घरी आला तेव्हा प्रकार उघडकीस आला. अप्पासाहेबांसह त्यांच्या पत्नी व मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजार्यांनी लगेचच याची माहिती पोलिसांना दिली.
तपासकार्य सुरू
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चाकूने भोसकून या चौघांचीही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, हत्याकांडामागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.