पुणे । शहरातील माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नी, निराधार विधवा महिला, 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आणि पुणे शहरातील ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहे, अशा नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून (2018-19) मिळकत करातील सर्वसामान्य करात 50 टक्के सूट दिली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
राज्यातील काही महापालिका तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अशा प्रकारच्या कर सवलती देण्यात येत असल्याने पुण्यातदेखील ही कर सवलत देण्याची मागणी केली जात होती. तसेच स्थायी समितीने काही महिन्यांपूर्वीच माजी सैनिकांना मिळकतकरात सवलत देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने त्यास मान्यता दिलेली असल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने पुढील आर्थिक वर्षासाठी ही सवलत प्रस्तावित केली आहे. स्थायी समितीच्या पुढील आठवड्यात होणार्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या सवलतीमध्ये या सवलतधारकांना हा कर 31 मे पूर्वी भरणे बंधनकारक आहे. तर ज्या दिव्यांग व्यक्तींना कर सवलत दिली जाणार आहे. त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीस कालावधी लागणार असल्याने त्यांना सवलतीच्या दरात कर भरण्यास सप्टेंबरअखेरची मुदत राहणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.