माजी सैनिक स्वयंसहायता बचत गटाची स्थापना

0

सासवड । पुरंदर तालुक्यातील वनपुरी गावातील माजी सैनिकांनी एकत्रित येऊन एका बचत गटाची नुकतीच स्थापना केली आहे. माजी सैनिक स्वयंसहायता बचत गट असे याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या गटाच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये एकोपा राखणे, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बचत गटाच्या वतीने देण्यात आली.

अध्यक्षपदी नामदेव कुंभारकर
वनपुरी आणि उदाचीवाडी येथील सर्व माजी सैनिक एकत्र आले असून या गटाच्या अध्यक्षपदी नामदेव कुंभारकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी शांताराम कुंभारकर यांची तसेच सचिवपदी नारायण कुंभारकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रमेश महामुनी, महादेव कुंभारकर, बाळासाहेब कुंभारकर, दत्तात्रय कुंभारकर, नितीन जगताप, काकासो कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर अनिल कुंभारकर, रामदास कुंभारकर, सुरेश झेंडे, सुनील कुंभारकर, रामभाऊ कुंभारकर, भानुदास आढेकर, तसेच स्व. आबासो कुंभारकर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सविता कुंभारकर आदी सदस्यांनी या गटाची स्थापना केली आहे.

आर्थिक सहाय्य करणार
गटात शेअर्स 1 हजार तसेच दरमहा 1 हजार रुपये या प्रमाणे बचत करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकमेकांच्या अडीअडचणी दूर करणे, गावामध्ये एकी राखणे यासाठी संघठन करण्यात आले आहे. सर्वच जवान एकदा लष्करात सामील झाल्यानंतर त्यांना केवळ देशसेवा करणे हेच एकमेव उद्दिष्ट असते. अशा वेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्याबरोबर सामील असते. कोणताही सण, उत्सव असो कोणताही कार्यक्रम असो त्यांना यामध्ये सहभागी होता येत नाही. तर सेवानिवृत्ती नंतर केवळ कुटुंबासोबत राहावे लागते. गटाच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक मदत केली जाणार आहे. गावामध्ये कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष नामदेव कुंभारकर यांनी दिली.