लोणावळा : माझं मरण हे केवळ ब्रह्मदेवालाच माहीत आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला असून ते उतारे मी पायाने उडवून लावले आहे असे प्रतिपादन लोणावळ्याच्या नगरध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले. केरळ येथून फेसबुकवर त्यांनी एक व्हिडिओ मेसेज अपलोड केला असून त्याद्वारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित करून तसे मृत्युयंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरढी यांचा उतारा खुद्द त्यांच्याच घराच्या दरवाजापुढे आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यासर्व प्रकारावर जाधव यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे करणारा जवळचाच व्यक्ती असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी मरणाला घाबरत नाही, उद्या मारायचं ते आज मरेल, पण हा असला प्रकार करणार्याने आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्च करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. हा प्रकार ज्याने केला आहे त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.