माझगाव येथे आंगन बारवर पोलिसांचा छापा

0

मुंबई – माझगाव परिसरातील आंगन बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंटवर काल रात्री उशिरा भायखळा पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात चार बारबाला आणि महिला सिंगर अशा चौघांची पोलिसांनी सुटका केली तर बार चालकासह पाचजणांना अटक केली. बारचालक राजू तुलसी यादव, मॅनेजर चंद्रकांत विष्णू सूर्यवंशी, वेटर तुकाराम श्रवित घाणेकर, मोहम्मद करीद रेहमत अन्सारी आणि रमेश हिरामण पंडित अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना येथील स्थानिक न्यायालयाने जामिनावर सोडून दिले आहे.

माझगाव येथील आर. बी. मार्गावरील गंगा निवास इमारतीमध्ये आंगन नावाचे एक बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट आहे. या बारमध्ये डान्स बारचा परवाना नाही. तरीही तिथे रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरु असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी काल रात्री उशिरा तिथे भायखळा पोलिसांच्या एका विशेष पथकाने छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना दोन बारबाला आणि दोन बार सिंगर अश्‍लील गाण्यावर ग्राहकांसोबत अश्‍लील चाळे करताना दिसून आले. त्यानंतर या चारही बारबाला आणि महिला सिंगरची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भायखळा पेालिसांनी बारचालकासह मॅनेजर, कॅशिअर आणि तीन वेटर अशा पाचजणांना अटक केली. मात्र हा जामिनपात्र गुन्हा असल्यानंतर नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.