व्याख्यानमालेचा समारोप : वरणगावात जीवन महाजन यांनी कवितेतून मांडली बापाची महती
वरणगाव- बाप हा शब्दांपलिकडचा व्याप असताकत्याची किर्ती शब्दात मांडू शकू, असे शब्द नाहीत. जिथे क्षितिजाची हद्द संपते तिथून बापाची सीमा सुरू होते, असं म्हटलं जातं. याची परीचिती जीवन पांडुरंग महाजन यांच्या स्वरचित ‘मला माझा बाप देवासारखा वाटला’ या कवितेतून येथील विद्यार्थ्यांना आली. ही कविता ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले. वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालयात भागवत राघो झोपे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. त्यात प्रमुख वक्ते असलेले सेंट अलॉयसीस स्कूलचे शिक्षक जीवन महाजन हे बोलत होते. स्व.भागवत झोपे यांचे सुपूत्र चंद्रशेखर झोपे व दीपक झोपे यांच्या पुढाकाराने ही फिरती व्याख्यानमाला घेण्यात आली. संकल्पना सुनील वानखेडे यांची होती.
यांची होती उपस्थिती
समारोपाच्या अंतिम पुष्पाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत हरी बढे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक आर.ए.वाघ, उपमुख्याध्यापिका व्ही.बी.चव्हाण, श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर झोपे यांची उपस्थिती होती. राजेंद्र चौधरी, रवी कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वाय.आर.पाटील यांनी केले. आभार एम.एस.भंगाळे यांनी मानले. विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मनन करण्याची गोडी लागावी, संस्कारक्षम पिढी तयार व्हावी यासाठी फिरती व्याख्यानमाला हा उपक्रम पथदर्शी आहे, अशा उपक्रमांचा समाजातील इतर घटकांनीही बोध घ्यावा, अशी अपेक्षा चंद्रकांत बढे यांनी व्यक्त केली.
विचारांचा यज्ञ प्रज्वलित ठेवा
जन्मदात्यांचे स्मरण व्हावे म्हणून दान-धर्म केला जातो मात्र भागवत झोपे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपूत्रांनी फिरत्या व्याख्यानमालेतून विचारांचे दान देण्याची जी वेगळी वाट निवडली ती संस्कारक्षम पिढी घडवणारी आहे. विचारांचा हा ललामभूत यज्ञ निरंतर प्रज्वलित राहावा यासाठी धडपडणार्या टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशी भावनाही जीवन महाजन यांनी व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफताना व्यक्त केली.
बापाची अवहेलना थांबवा
काळजातील दु:ख, वेदना, चिंता, अश्रू, पश्चाताप, मनातील गुंतागुंत, पोट खपाटीला गेलं असलं तरी मुला-बाळांना हसत ठेवणारं पहाडासारखं व्यक्तिमत्व म्हणजे बाप असतो. त्याची अवहेलना होऊ नये म्हणून आयुष्यात कधीच बापावरून शिवी देऊन नका. पुराण, इतिहास, साहित्यिक कवींनीही बाप दुर्लक्षित केला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर या महान विभूतींचा जीवनपट समजून घ्या, असा सल्लाही जीवन महाजन यांनी दिला.
आई-बाप संस्कारांचे ऊर्जाकेंद्र
आई आणि बाप हे दोन व्यक्तिमत्व नसून ते महत्त्वाचे संस्कार व ऊर्जाकेंद्र आहेत. संस्कारांची सरीता प्रवाहीत ठेवण्यासाठी त्यांच्याशी काळजातला संवाद निरंतर असायला हवा. मी पणाच्या बाह्यांगापासून कोसो दूर असलेला बाप समजून घ्यायचा असेल तर एकदा डोळे बंद करून आठवून पहा भूतकाळ. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश वक्ते महाजन यांनी मुलींचा बाप, मुलांचा बाप, आपल्या बापाचा बाप ही कथा व स्वरचित कवितेतून समजावून सांगितला.