अहमदाबाद । देशाचे 14 वे पंतप्रधान ठरवण्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर युपीएकडून काँग्रेसच्या नेत्या मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज शुक्रवारी अहमदाबादमधील साबरमती आश्रमातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. जातींना एका गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवे, असे मीरा कुमार यांनी आधीची म्हटले आहे.
दलित विरूध्द दलित असे का?
एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना निवडणुकीत उतरवण्यात आले आहे. या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असे स्वरुप दिले जात असल्याबद्दल त्यांनी याआधी खंत व्यक्त केली होती. याआधीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये अनेकदा उच्च जातीचे उमेदवार उभे होते. पण त्यावेळी कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही. कधी तशी चर्चा झाल्याचेही मला आठवत नाही. कोविंद आणि मी निवडणूक लढवत आहोत. म्हणूनच दलित निवडणुकीला उभे आहेत, असे बोलले जात आहे. मग आमच्यातील बाकीचे गुण गौण ठरतात. यावरून समाज आजही काय विचार करतो हे कळते, अशा शब्दांत मीर कुमार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
या भागातील दबलेल्या जनतेने प्रगती करावी!
यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे गुजरातमधील नेते भारतसिंह सोलंकी आणि शंकरसिंह वाघेला होते. तब्बल 40 मिनिटे त्या या आश्रमात होत्या. माझा संघर्ष गांधीजींच्या तत्त्वांवर आधारित आहे, या भागातील दबलेल्या जनतेने प्रगती करावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. गांधीजींचीही तीच इच्छा होती, असेही त्या म्हणाल्या.