पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा या पुण्याच्या संस्थेने माझा केलेला गौरव व सन्मान हा अंबाजोगाईच्या साहित्य, संस्कृती व समाजाच्या सभ्यता व संस्कृतीचा सन्मान आहे अशी कृतज्ञता दगडू लोमटे यांनी पुण्यात झालेल्या विशेष सन्मान समारंभात सन्मानाला उत्तर देताना व्यक्त केली.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा या संस्थेच्या वतीने त्यांच्या साहित्य, सांसकृतिक व समाजसेवेचे कार्य पहाता विशेष सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर संयोजक सचिन ईटकर, उध्दव कानडे, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, मधुकर भावे, शशिकला रावसाहेब शिंदे, आ. प्रशांत ठाकुर, उल्हास दादा पवार, रामदास फुटाणे, हनुमंत गायकवाड, रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्राप्त विनायकदादा पाटील – नाशिक, न्या. नरेंद्र चपळगावकर -औरंगाबाद व रामशेठ ठाकुर – रायगड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सन्मानाला उत्तर देताना दगडू लोमटे म्हणाले की, बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान, मराठवाडा साहित्य परिषद व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह अंबाजोगाई यांच्या कार्याला मी जोडून घेतले व मला एक नवा आयाम मिळाला. महाराष्ट्रात माझी या तीन महत्वाचा संस्थेच्या कार्यामुळे ओळख झाली व मी चांगले काम करू शकलो. बाबा आमटे यांच्या सोमनाथ श्रमसंस्कार छावनीचे संस्कार व अंबाजोगाईच्या मातीचे अनेक संस्कार मला घडवत गेले. कै. भगवानरावजी लोमटे, कै राम मुकद्दम यांच्यासह अनेक मित्र व वरिष्ठांच्या प्रेरणा सतत माझ्या कामी आल्या. गेली 34 वर्ष यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह तीन दिवस विवीधांगी आयोजित केला जातो. जो महाराष्ट्रात नावारूपाला आला. याची मुळ संकल्पना कै. भगवानराव लोमटे जे बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांची होती. यशवंतराव चव्हाण यांचा विचार अंबाजोगाईला रूजवत आलो. यासमितीचे कार्य मला करता आले. मराठवाडा साहित्य परिषदेवर पदाधिकारी म्हणुनही वेगळे नाविण्यपुर्ण काम करता आले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात यांनी अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा कामाबाबत म्हणाले की, अंबाजोगाई सारख्या छोट्या शहरात सतत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा सर्वव्यापी समारोह होतो याचा मला खुप अभिमान आहे. मला हा समारोह प्रत्यक्ष ऐकण्याची व पाहण्याची उत्सुकता आहे. त्यांनी भाषणात दगडू लोमटे यांच्या एकुण कार्याचा गौरव केला.
सुशिलकुमार शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवर व विशेष सन्मान केलेल्या दगडू लोमटे यांचा गौरव केला व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात 1990 च्या आसपास एकदा हजेरी लावलेली आठवण केली.
पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार कवी उध्दव कानडे यांनी मानले. सर्वच पुरस्कार प्राप्त व विशेष सन्मान असलेल्या व पाहुण्यांचा परिचय मधुकर भावे यांनी करून दिला. यावेळी निवारा सभागृह, एस. एम.जोशी फाउंडेशनचा परिसर येथे झालेल्या या समारंभास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.