माझी आमदारकी संपविण्याची अधिकार्‍यांनी घेतली ‘सुपारी’

0

आमदार राजूमामा भोळे यांचा आरोप


जळगाव: ‘अमृत’ योजनेचे काम करताना अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करतात. नागरिक आम्हाला शिव्यांची लाखोली वाहतात. या योजनेतील काम अपूर्ण असल्याने नागरिक आम्हाला म्हणतात काम पूर्ण करा अन्यथा राजीनामा द्या, नाहीतर काळे फासू. अधिकार्‍यांनी कंत्राटदाराला पाठीशी घातल्याने आमच्यावर नागरिकांचे बोलणे ऐकण्याची वेळ आली असल्याचे सांगत अधिकार्‍यांनी मी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी सुपारी’ घेतली असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेत (दिशा) आज केला. दरम्यान आमदार भोळे यांच्या या गौप्यस्फोटाने दिशा समितीच्या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनीधी व अधिकार्‍यांच्या भुवयाच उंचावल्या.

दिशा समितीच्या बैठकीत खासदार रक्षा खडसे यांनी अमृत योजनेच्या कामाची माहिती विचारली असता, अमृतचे काम जळगावला 44 टक्के पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराने सबकंत्राटदार नेमला. त्याला पेमेंट मूळ कंत्राटदाराने लवकर न दिल्याने काम गेले काही महिने बंद होते. काम पूर्ण करावयाची मुदत दोन वर्षे होती.तीही पूर्ण झाली. असे माहिती महापालिकेचे अभियंता भोळे, बोरोले यांनी दिली. त्यावर खासदारांसह जिल्हाधिकारी संतप्त झाले. जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर तुम्ही काय कारवाई केली ? ज्या स्टेपवर काम पूर्ण व्हायला पाहिजे तेव्हाच तुम्ही नोटीस का दिली नाही, त्याला ब्लॅकलिस्ट का केले नाही. एकावेळी भुयारी गटारी, अमृत योजनेचे व रस्त्यांची कामे का केली नाही? अशी प्रश्नांची सरबत्तीच संबंधित अधिकार्‍यावर केली.

आणि आमदार भोळेंचा गौप्यस्फोट

आमदार भोळे यांनी अधिकार्‍यांच्या कामाबाबत त्रागाच केला. अध्यक्ष महोदय अधिकारी ऐकत नाही, कंत्राटदाराला पाठीशी घालतात. अनेक शासकीय योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देत नाही. याच्या नाकर्तेपणामुळे अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली. नागरिक आम्हाला कामे करा नाहीतर राजीनामा द्या, असे सांगतात. अधिकार्‍यांचा नाकर्तेपणामुळे त्यांनी मी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी सुपारी घेतल्याचा गौप्यस्फोट केला.

आठ दिवसात कारवाई व्हावी

अधिकार्‍यांची भूमिका पाहून खासदार खडसे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले, की आठ दिवसात कंत्राटदारावर कारवाई करावी, अन्यथा अधिकार्‍यांना कारवाई करावी नंतर आम्ही सर्वजण कंत्राटदारावर कारवाईसाठी एकत्र येऊ असा इशाराही त्यांनी दिला.

भुसावळचेही काम अपूर्णच जळगाव व भुसावळलाही एकाच कंत्राटदाराने अमृतचे काम घेतल्याने जळगाव प्रमाणेच भुसावळचेही काम अपूर्ण आहे. भुसावळचा कंत्राटदार दोन वर्ष कामे करण्यास आणखी मागतो. त्यावर खडसेंनी सहा महिन्यात काम करण्याचे आदेश दिले. वाट्टेल ते करा, काम सहा महिन्यात पूर्ण करा. अन्यथा कारवाईला सामोरे जो असे खासदार खडसे यांनी सांगितले.