‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत दर्जा वाढविण्यासाठी सुधारणा

0

पुणे । गरीब-गरजूंसह मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना राज्य शासनाच्या योजनेंचा लाभा मिळावा यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत बदल करण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी या योजनेत सुधारणा करण्यात आली असून, या योजनेला ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

कुटुंब नियोजन दाखला बंधनकारक
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ही सुधारित लागू करण्यात आली आहे. या सुधारित योजनेमुळे मध्यमवर्गातील कुटुंबाना ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. पूर्वी सुरू असलेल्या माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये अनेक त्रुटी असून त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यानुसार वित्त विभागाने सर्व बाबींचा अभ्यास करून ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना’ आणली. यामध्ये एका मुलीच्या जन्मानंतर माता-पिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्यांच्या मुलीच्या नावावर या योजनेअंतर्गत त्वरीत 50 हजार रुपये बँकेत गुंतवण्यात येईल. त्यासाठी माता-पिताने एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे.

दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार
गुंतवणुकीनंतर मुलीला सहाव्या आणि बाराव्या वर्षी मुद्दलावरील केवळ व्याज काढता येणार आहे. तर 18व्या वर्षी मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम काढता येणार आहे.
तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर माता-पितांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रूपये मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यात येईल. त्यासाठी माता-पिताने एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे.
त्यानंतर या दोन्ही मुलींना त्यांच्या नावावर असलेल्या प्रत्येकी 25 हजार रूपयांच्या मुद्दलीवरील व्याज सहाव्या आणि बारव्या वर्षी काढता येईल.

18 वर्षे पूर्ण, दहावी उत्तीर्ण व अविवाहित असणे आवश्यक
18व्या वर्षी मुद्दल आणि व्याज अशी पूर्ण रक्कम या दोन्ही मुलींना मिळेल. मुदत ठेवीत गुंतवलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील 18व्या वर्षी देय असणारे व्याज मिळण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आणि ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच ती अविवाहित असणे आवश्यक आहे. तरचा मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले.