माझी बनावट सेक्स सीडी बनविण्याचा कट

0

प्रवीण तोगडियांचे मोदींवर पुन्हा गंभीर आरोप

अहमदाबाद : विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अहमदाबादमधील रूग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत घेऊन हे आरोप केले. दिल्लीतील पॉलिटिकल बॉसच्या इशार्‍यावर गुजरात पोलिस माझ्याविरोधात मोठा कट रचत असून, कटात गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे. के. भट्ट यांचाही समावेश आहे. संजय जोशी यांच्या बनावट सेक्स सीडीप्रमाणे माझीही बनावट सीडी करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

माझ्या माणसांना टॉर्चर करत आहेत!
आपल्या दुसर्‍या पत्रकार परिषदेतही डॉ. प्रवीण तोगडीया यांनी अतिशय गंभीर असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केले आहेत. तोगडिया म्हणाले, गुजरातच्या क्राईम ब्रँचचे कॉन्परन्सी ब्रँचमध्ये रूपांतर झाले आहे. सहआयुक्त जे. के. भट्ट यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्स सार्वजनिक व्हावेत. ते दिल्लीतील पॉलिटिकल बॉसच्या इशार्‍यावर काम करत आहेत. माझा दावा आहे की, नुकताच त्यांची अनेकवेळा पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली आहे. मी मित्र नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी क्राईम ब्रँचला कॉन्परन्सी ब्रँच बनवून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये. रात्री दोन वाजता कोणत्याही व्यक्तीला उठवण्याचा कोणाला अधिकार आहे? माझ्या माणसांना उठवून टॉर्चर करण्यात येत आहे. त्यांच्यावर माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी दबाव आणला जात आहे. 2005 मध्ये संजय जोशी यांच्याविरोधातही बनावट व्हिडिओ बनवून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रचार व्यवस्थेला बदनाम करण्यास सुरूवात झाली होती. बनावट सीडी बनवणार्‍याचे नाव मला माहीत आहे, योग्यवेळी त्याचा मी खुलासा करेन, असे तोगडिया म्हणाले.

तोगडियांचे आरोपसत्र सुरुच!
तोगडिया सोमवारी संशयीतरित्या गायब झाले होते. नंतर संध्याकाळी अहमदाबादमधील शाहीबाग परिसरातील एका उद्यानात ते बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आवाज दाबण्याचे काम चालू असून, पोलिसांनी माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तोगडिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मोदी यांच्यावर आरोप केले आहे.