माझ्या घराचा अन् साहित्याचा काहीही संबंध नाही. दै. लोकमत व दै. जनशक्तीची रविवारची साहित्य पुरवणी मी नियमित वाचत होतो. पाळधी ता. धरणगाव पूर्वीचा एरंडोल तालुक्यातील पाळधी येथील सरजूबाई नंदलाल झंवर विद्यालयात मी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. या विद्यालयात होणार्या विविध वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेत असे. सर्वश्री य. कि. चांदवडकर, पी. एन. कुळकर्णी, सौ. माया दिलीप धुप्पड हे माझे शिक्षक मला मार्गदर्शन करायचे. माझ्याकडून भाषणाची तयारी करून घ्यायची.शाळेतल्या पुस्तक पेटीतून पुस्तके वाचायला द्यायचे. 1988-89 मध्ये दै. जनशक्तीच्या महिला पुरवणीमध्ये एक लेख प्रसिद्ध झालेला होता. तो लेख मला खटकला होता. तेव्हा मी ‘अशी ही स्त्रीची परीक्षा का घेता’ हा पहिला लेख लिहिला तो जनशक्तीने प्रसिद्ध केला.
नंतर वाचन वाढू लागले. रवींद्र पिंगे यांचे ’दुसरी पौर्णिमा’ व उर्मिला पवार यांचे ‘आयदान’ ही दोन पुस्तके सर्व प्रथम वाचली. साहित्य क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक मान्यवर लेखकांशी संपर्क येत गेला. प्रा. डॉ. उषा सावंत, कविवर्य स्व. वि. भा. नेमाडे, हे मला लेखनासाठी मार्गदर्शन करू लागले. विविध वृत्तपत्रांतून साहित्य प्रकाशित होऊ लागले.
अत्यंत साध्या सोप्या भाषेतील ‘आधार स्तंभ’ हे माझे पहिले व्यक्तिचित्राणात्मक पुस्तक. सौ. माया धुप्पड यांची प्रस्तावना तर प्रख्यात लेखक प्रा. आनंद यादव, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रभाकर श्रावण चौधरी यांचा आशीर्वाद या पुस्तकाला आहे. मन बोलते बोलते या काव्यसंग्रहाला वि. भा. नेमाडे यांची प्रस्तावना तर महाराष्ट्र भूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचा आशीर्वाद लाभलेला आहे, या संग्रहाचे प्रकाशन कविवर्य प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते प्रख्यात लेखिका गिरिजा कीर, कविवर्य प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या उपस्थितीत झाले होते.
उमलती फुले या बालकथा संग्रहाला प्रख्यात लेखिका शिरीष पै यांची प्रस्तावना तर प्रख्यात लेखक प्रा. राम शेवाळकर, डॉ. न. म. जोशी यांचा आशीर्वाद लाभलेला असून विधानसभेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. पणती, शब्द झंकार, कवी नावाचा पक्षी (वि. भा. नेमाडे यांच्या निवडक कवितांचे संकलन) अशी तीन संपादित काव्य संग्रह प्रकाशित आहेत. एकूण अशी सहा पुस्तके प्रकाशित आहेत. सातत्याने वाचन लेखन सुरू आहे.
– सतीश जैन
अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ,जळगाव
9850177342