माझे अर्धवट वक्तव्य दाखविले-शाहिद आफ्रिदी

0

लाहोर- काश्मिरच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी चांगलाच चर्चेत आला होता. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीचा माध्यमांशी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये बोलताना आफ्रिदीने, पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही, पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाही, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये असे वक्तव्य केल्याचे दाखवले होते. मात्र आपला व्हिडीओ अर्धवट दाखवण्यात येत असल्याचे शाहिद आफ्रिदीने सांगितले आहे.

सोशल मीडियावरचा तो व्हिडीओ अपूर्ण आहे, काश्मीरवर मी ज्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. तो अर्थच व्हिडीओत दाखवला गेला नाही. काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे, भारताच्या जुलमी सत्तेखाली काश्मीरचे लोक राहत आहेत. माझ्यासकट सर्व पाकिस्तानी नागरिकांचा काश्मिरी लोकांच्या लढ्याला पाठींबा आहे. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे.

याचसोबत शाहिद आफ्रिदीने भारतीय प्रसारमाध्यमांवरही या प्रकरणी खापर फोडलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे आफ्रिदीने आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे.