भाजप सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन
मुंबई: विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावर बोलताना माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राजकीय शेरेबाजी केली. ‘मी अधिक काळ विरोधी पक्षात राहिलो असल्याने अनेकदा माझ्या बोलण्यातून सरकारविरोधी सूर उमटत असतो. बोलण्याच्या ओघात आता मी सत्ताधारी पक्षात आहे हे लक्षात राहत नाही. त्यामुळे माध्यमातून मी भाजप सोडणार अशी चर्चा सुरु होते. मात्र मी मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतो की मी भाजप सोडून जाणार नाही, तसेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले असून ते मी कोणालाही सांगणार नाही अशी शेरेबाजी खडसे यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल वाद सुरु आहे. यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आमचे ठरले आहे, असे म्हणतात. काय ठरले आहे ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे, त्यांनी सांगितल्यास मी देखील माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काय ठरले ते सांगेल असे खडसे यांनी सांगितले.
विखे पाटलांचा चिमटा
राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिमटा देखील यावेळी खडसे यांनी घेतला. मी ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, अनेकदा मला सत्ताधारी पक्षाकडून ऑफर येत होते, मात्र त्याचा मी कधीही स्वीकार केला नाही. विखे पाटील यांच्या सारखी परंपरा माझी नाही असे म्हणत त्यांनी विखे पाटील यांचा चिमटा घेतला. विखे पाटील चार वर्षे विरोधी पक्षनेते होते आता कॅबिनेट मंत्री झाले. याला नशीब लागत असे खडसे यांनी सांगितले.