माझे घर तारण ठेवा; पाच लाखही देतो!

0

पुणे । उद्योग व्यवसायातील सर्वपरिचित डीएसके बिल्डर गेल्या वर्षभरात चांगलेच चर्चेत आले आहेत. उद्योगक्षेत्रात नावलौकिक मिळवायला ज्यांना 60 वर्षे लागली, असे डीएसके विश्‍व सहा महिन्यांत पत्त्याच्या बंगल्यासारखे पडले. मोठ्या बिल्डरची ही अवस्था पाहता अनेक छोटे उद्योजक तसेच उद्योगक्षेत्रात येणारे नवउद्योजक धास्तावले आहेत, असे असताना देखील छोट्या उद्योजकांमध्ये डीएसकेंविषयी असलेला दांडगा विश्‍वासाची प्रचिती माने उद्योग समुहाने देऊ केलेल्या मदतीने येते. डीएसके विश्‍व संपू नये म्हणून छोटे उद्योग समूह मदतीस सरसावले आहेत. मीडियामुळे गुंतवणूकदार भयभीत झाले व आठ हजार एफडी होल्डरचे भवितव्य अ‍ॅसेट असताना धोक्यात आले. शिवाय गुंतवणूकदरांचे पैसे परत करणार असे डीएसकेनी यापूर्वीच जाहीर केले होते. यासर्व प्रकरणात हा बलाढ्य उद्योजक कोसळला आहे. असे मोठे उद्योजक जर नामशेष झाले तर छोट्या उद्योजकांची उमेद खचून जाईल असे पडसाद उद्योजकांमधून येत आहेत.

स्वतःचे घर तारण ठेवून 50 लाखांची मदत
डीएसकेंशी फारसा परिचय नसलेले; परंतु 2010मध्ये प्रथमच ‘डीएसके सेल्फ मेड मॅन 2010’ पुरस्काराचे मानकरी ठरलेले एमआयडीसी भोसरी येथील छोटे उद्योजक रामदास माने! खुद्द मानेंनी डी. एस. कुलकर्णी यांना स्वतःचे घर तारण ठेवून अप्रत्यक्षरित्या 50 लाखांची मदत तसेच प्रत्यक्षरित्या 5 लाखांची मदत देऊ केली आहे. एका छोट्या उद्योजकानेही बलाढ्य बिल्डरला वेळप्रसंगी देऊ केलेली मदत डीएसके विषयी असलेल्या विश्‍वासाचे द्योतकच नाही का?

उद्योगव्यवसाय म्हटला की चढ-उतार हे आलेच; असे असतांना उगाच सगळे रान उठवल जाते. व्यवसायच नव्हे तर जगणे पणाला लागत जेव्हा विश्‍वासार्हतेला तडा जातो तेव्हा बलाढ्य उद्योजकाचाही व्यवसाय कोलमडला जातो. डीएसके बिल्डरचा चांगुलपणा आणि दिलदारपणा जवळून अनुभवलेले रामदास माने म्हणाले, डीएसकेंना मदत करणे हा माझा भाबडेपणा नसून त्यांच्या चांगुलपणावरील गाढ श्रद्धा आहे.

नवउद्योजकांना प्रेरणा मिळेल
कुलकर्णी कुणाचेही पैसे बुडविणारे नाहीत व तसेच कोणतीही फसवणूक करणार नाहीत असे मानेंचे म्हणणे आहे. त्यांना थोडी वाढीव मुदत देण्यात यावी अशी विनंतीही मानेंनी नियमक मंडळ अधिकार्‍यांना केली आहे. मुदतवाढ न झाल्यास अनेक नवतरुण उद्योजकांवर विपरीत परिणाम होऊन नवनवीन उद्योग सुरू होण्याआधीच नकारात्मकता बळावल्याने संपुष्टात येतील. याउलट जर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी मुदत वाढ मिळाली तर अनेक उद्योजक डीएसकेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आजही डीएसके नव तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. या प्रकरणातून डीएसके बाहेर आल्यास नवउद्योजकांना उद्योग करण्याची प्रेरणा मिळेल.