पुणे । सवाई गंधर्व भीमसेन संगीत या महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी ‘शुद्ध सारंग’ मध्ये विलंबित झुमरा चे सादरीकरण केले. त्यानंतर तराणा आणि ‘बरस बिते हो तुम्हे धुंडत हुं’ ही बंदिश गायली. ‘अवघे गरजे पंढरपूर’ या भजनासह लोकप्रीय अशा ‘अरुणी किराणी’ या गीताने समारोप केला. त्यांच्या गायनास श्रोत्यांनी उभे राहून, टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. त्यांना निखील फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनिअम), प्रल्हाद जाधव व पूजा कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. माझे माहेर पंढरी या अभंगाने सवाई दुमदुमली होती.
व्हायोलीन वादनात रसिक तल्लीन
प्रख्यात व्हायोलीन वादक पद्मा शंकर यांचे कर्नाटक संगीतातील सुरबद्ध व्हायोलीन वादन झाले. यात रसिक तल्लीन झाले होते. त्यांनी राग हंसध्वनीतील ‘वातापि गणपती भजेहं’ या आदितालातील रचनेने सादरीकरणास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधून संत त्यागराजा यांची राग चारुकेशीतील भक्तीरचना सादर केली. त्यांनी व्हायोलिनवर ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग, राग मधुवंतीतील ‘तिल्लाना’ आणि ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ ही लोकप्रिय रचना देखील सादर केली. नीला वैद्य (तानपुरा), के. पार्थसारथी (मृदंग), जी. हरिहर शर्मा (खंजीरा) यांनी साथसंगत केली.
सरोद वादनाने पुणेकर मंत्रमुग्ध
राजन कुलकर्णी व सारंग कुलकर्णी यांचे सरोद वादन झाले. राजन कुलकर्णी भारतातल्या सर्वोत्तम सरोद वादकांपैकी एक मानले जातात. त्यांनी पुण्यात सारंग संगीत विद्यालयाची स्थापना केली आहे. त्यांनी सरोद वादनाला राग वाचस्पती मधील आलाप आणि आलाप जोडझाला ने प्रारंभ केला. द्रुत त्रितालात एक बंदिश पेश करीत समारोप केला. त्यांच्या सरोद वादनाला निशिकांत बडोदेकर (तबला) आणि ओंकार दळवी (पखवाज) यांनी साथसंगत केली.
अन् रंगली मैफल
प्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांचे यावेळी गायन झाले. त्यांनी राग भीमपलासने गायनास सुरूवात करून उत्कृष्ट सादरीकरणाने मैफल रंगवत नेली. ‘मिरज मे घुमने जारे शाम’ भीमपलास रागाने त्यांनी गायनाची केलेली सुरुवात ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा’ या अभंगाने उत्तरोत्तर रंगत गेली. प्रभाकर पांडव (हार्मोनियम), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीर महाराज अवचार (पखावज), संदीप गुरव, नामदेव शिंदे, अनिता सुळे व दशरथ चव्हाण (तानपुरा व स्वरसाथ) आणि सर्वेश बद्रायणी (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली.
शास्त्रीय संगीताची मेजवानी
आनंद भाटे यांचे शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधी मिळाली. कौटुंबिक वारसा लाभल्याने त्यांनी लहानवयातच आपल्या कलेचा ठसा उमटवला. किराणा घराण्याचे दिग्गज पं. भीमसेन जोशी व ख्याल गायकीचे पं. यशवंतराव मराठे यांचे शिष्य असलेल्या भाटे यांना आनंद गंधर्व किताब मिळाला आहे. त्यांना भरत कामत (तबला), विनय चित्राव व मुकुंद बाद्रायने (तानपुरा), सुयोग कुंडलकर (हर्मोनिअम) यांनी साथसंगत केली. सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या श्रुश्राव्य गायनाने झाली. सवाई गंधर्व महोत्सवाला पुणेकर संगीत प्रेमींचा वाढता प्रतिसाद शेवटच्या दिवशीही कायम होता. किंबहुना काही कारणात्सव उपस्थित राहू न शकलेला श्रोत्यांनी रविवारची सुट्टी सार्थकी लागावी आणि सुरेल संगीत मैफिलीचा आस्वाद घेता यावा म्हणून रमणबागेत एकाच गर्दी केली. काहींना तिकीट न मिळाल्याने परत जावे लागले.