माझ्यातील हिंमतीला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही – नितीन गडकरी

0

नवी दिल्ली : माझ्यातील हिंमतीला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं सांगून यापुढं ते जबाबदारीनं बोलतील-वागतील अशी अपेक्षा आहे, असे खडे बोल नितीन गडकरी यांनी राहुल गांधीनां सुनावले आहे. भाजपत नितीन गडकरींमध्येच काही तरी करण्याची धमक आहे, असा स्तुतीवर्षाव करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गडकरींनी निशाना साधला आहे.

‘भाजपमध्ये फक्त तुम्ही आहात, की ज्यांच्यात काहीतरी करण्याची धमक आहे. त्यांनी आता शेतकऱ्यांच्या व्यथा, नष्ट होत चाललेल्या संस्था आणि राफेल घोटाळ्यावर बोलण्याची गरज आहे,’ राहुल गांधी यांनी असं ट्विट करून गडकरींचं कौतुक केलं होतं. त्यावर गडकरींनीही ट्विट करत राहुल यांना प्रत्युत्तर दिलं. माझ्यातील हिंमतीला राहुल गांधी यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं सांगून शेतकऱ्यांच्या अवस्थेला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘काँग्रेसच्या धोरणांनी शेतकऱ्यांची जी वाईट अवस्था केली आहे, त्यातून बाहेर काढण्याचे काम मोदी करत आहेत आणि आम्ही त्यात यशस्वी ठरत आहोत. तुमच्यासह काही लोकांना मोदींचं पंतप्रधान होणं खुपतं आणि म्हणूनच असहिष्णुता आणि घटनात्मक संस्था नष्ट होत असल्याची स्वप्ने तुम्हाला पडत आहेत,’ असं गडकरी यांनी म्हंटले आहे.

‘आमचा लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास आहे. आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे. तुमचे हे डावपेच कधीच यशस्वी ठरणार नाहीत. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि आम्ही देशाला पुढे नेऊ,’ असा ठाम विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.