मुंबई: शिखर बँकेत ठेवीच्या रकमेपेक्षा मोठा घोटाळा झाला असा आरोप केला गेला. मात्र ठेवी पेक्षा मोठा घोटाळा होऊन बँक नफ्यात कशी? यावरून आमची बदनामी केली गेली. कोणीही उठतात आणि वाटेल त्या किंमतीचा घोटाळा केल्याचे आरोप करतात असे हे बदनामीकारक असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शिखर बँक आता २८५ निव्वळ नफ्यात आहे, घोटाळा झाला असता तर इतका नफा झाला असता का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
यात शरद पवारांचा दुरान्वये संबंध नाही, तरीही त्यांच्यावर गुन्हा नोंदविला गेला. संबंध नसताना शरद पवारांना बदनाम केले गेले. आपल्यामुळे शरद पवार बदनाम झाले हे मला खटकले. ज्यांच्यामुळे मी मोठा झालो त्यांची बदनामी झाल्याने मी अस्वस्थ झालो, त्यामुळेच मी राजीनामा दिला. मुंबईत पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी अजित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
आमच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही कलह नसून केवळ बदनामी केली जात आहे. आमचे कुटुंब एक आहे आणि एक राहणार आहे असेही अजित पवारांनी सांगितले.
या प्रकरणात निवडणुकीच्या काळातच कसे गुन्हे दाखल झाले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन सरकारने आमच्या विरोधात कारवाई केल्याचे आरोप अजित पवारांनी केले.
काल मी माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. त्यामुळे आमच्या हितचिंतक आणि समर्थकांना धक्का बसला. सहकाऱ्यांना न विचारता राजीनामा दिल्याने सगळेच चिंतीत झाले. पण मी कोणाला सांगितले असते तर त्यांनी मला रोखले असते. ही माझी चूक झाली, कार्यकर्ते, सहकाऱ्यांच्या भावना दुखविल्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो असे अजित पवारांनी सांगितले.