सांगली : कोरेगाव भीमा येथे दंगल, हिंसाचार घडवल्याचा करण्यात आलेला आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी फेटाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्रांच्या आधारावर आम्ही राष्ट्रजागृतीचे काम करतो. हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे भिडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार भडकावल्याचा आरोप संभाजी भिडेंवर करण्यात येत आहे.
त्यांच्यावर औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेची काहीही माझा संबंध नाही, असे भिडे यांनी स्पष्ट केले आहे. कोरेगाव भीमामधील हिंसाचाराला मी कारणीभूत आहे, असा आरोप करत आंबेडकरांनी माझ्या अटकेची मागणी केली आहे. पण त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भिडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचे मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाला परवानगी नाकारली आहे.