माझ्यावर अन्याय करा परंतु जनतेवर अन्याय करू नका; खडसेंचा सरकारवर संताप

0

मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरले. मत्स्य विद्यापीठा संदर्भातील विधेयकावर बोलतांना खडसे यांनी सरकारला लक्ष केले. चार वर्षापूर्वी खान्देशात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प रद्द करण्यात आल्यामुळे खडसे यांनी सरकारला धारेवर धरले. तुम्हाला नाथाभाऊवर अन्याय करायचा असेल तर करा, मी तुम्हाला चालत नसेल तर मला बाजू करा परंतु जनतेवर अन्याय करू नका, अशा शब्दात खडसे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. त्यानंतर सभागृहनेते विनोद तावडे यांनी एकनाथराव खडसे यांनी मांडलेल्या प्रशांबाबत दोन दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले. मंत्री जानकर यांनी दोन दिवसात बैठक घेऊन जळगावचे प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले.

चार वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेले खान्देशातील लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र पशुवैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प रद्द करण्याचे घाट सरकारने घातले आहे, असे आरोप एकनाथराव खडसे यांनी केले. नुसती घोषणा करायची त्याची अमलबजावणी न करण्याचे सरकारचे धोरण आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ५० वर्षात कृषी क्षेत्रातील जे प्रकल्प झाले नाही, ते प्रकल्प मी मंजूर केले. त्यासाठी आवश्यक जमिनी देखील घेतल्या. मात्र सरकार ते प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी रद्द करत आहे. माझ्याकडील मंत्रीपद गेले म्हणून प्रकल्प रद्द करण्यात आले आहे का? सरकारने ते स्पष्ट करावे, असा प्रश्न देखील एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. रद्द झालेले प्रकल्प तात्काळ मार्गी लावून जनतेला न्याय द्यावे अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.