नवी दिल्ली-धुळ्यामध्ये रविवारी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी आलेल्या नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला केल्याचे प्रकरण थेट लोकसभेत पोहोचले आहे. खासदार हिना गावित यांनी या प्रकरणात हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसभेत बोलताना केली.
या हल्ल्याबद्दल बोलताना आज गावित यांनी लोकसभेत एक निवेदन केले. ‘मी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केला जातोय ही अत्यंत खेदाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
पोलिसांच्या उपस्थितीमध्येच हा संबंधित प्रकार घडल्याने खासदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलतान गावित यांनी पोलीस जर एखाद्या महिलेला सुरक्षा देऊ शकत नसेल तर तेथील पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशीही मागणी केली आहे.
हल्ला केला म्हणून जाहीर सत्कार
आपल्यावर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही गावित यांनी या वेळी बोलताना दिली. ज्या व्यक्तीने हल्ला करण्याचे हे कृत्य केले त्याला अटक करुन लगेच सोडून देण्यात आले आहे. इतक्यावरच न थांबता हा हल्ला केला म्हणून त्याचा जाहीर सत्कार करून त्याची मिरवणूक काढण्यात आल्याचेही गावित यांनी सांगितले. जर आमच्या राज्यातील पोलीस महिला प्रतिनिधींचे संरक्षण करू शकत नसतील अन् उलट एखाद्या गुन्हेगाराला संरक्षण देत असतील तर ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणूनच घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी गावित यांनी केली.