नवी दिल्ली । यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुकणारा भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजय याने आपल्या भावनांना मोकळीक करुन देतानाच वस्तुस्थिती कथन केली व पैशापेक्षा देशाला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे. देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचा आनंद मोठा असल्यानेच आपण दुखापतीचा विचार न करता खेळलो व आयपीएल सामना काळात विश्रांतीनंतर आता श्रीलंका दौर्यावर जाणार आहे, असे मुरली विजय याने हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करायला मिळण यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट नाही. पैसा हा प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा आहे यात काही वाद नाही, मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होऊन देशासाठी आपले योगदान देणे महत्वाचे असल्याचेही सांगत मुरली विजय याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पांढर्या कपड्यांमध्ये कसोटी सामन्यांमधे भारताचे प्रतिनिधीत्व करण्यात मला जो आनंद मिळतो त्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. याच कारणामुळे मी दुखापतीचा विचार न करता कसोटी मालिकेत खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर शस्त्रक्रीयेसाठी मला आयपीएल खेळता येणार नाही याची मला जाणीव होती, मात्र आगामी श्रीलंका दौरा लक्षात घेऊन मी आयपीएलवर पाणी सोडायचे ठरवले.
लक्षवेधी सत्य
भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात केली. या काळात मुरली विजयचा महत्वाचा वाटा होता. त्यानंतर आयपीएल 2017 च्या हंगामात मुरली विजय किंग्ज 11 पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व करणार होता. मात्र शस्त्रक्रीयेमुळे त्याला संपूर्ण हंगामावर पाणी सोडावे लागले होते. यापार्श्वभूमीवर त्याने सांगितलेले सत्य लक्षवेधी ठरत आहे.