अमळनेर । कार्यकर्तेंची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम नेत्यांचे असून मी आजपर्यंत तेच करित आलोय तरी देखील गेल्या 13 महिन्यांपासून अनूभवतोय कि स्वार्थासाठी काही कार्यकर्ते आहेत, असो माझ्या नशीबात कष्ट आणी परिश्रम आहे 40 वर्ष विरोधी पक्षात राहिलो आहे, सद्या काही जण कर्तृत्वहिन झाले असल्याची खंत आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी भाजपात 25 वर्ष अहोरात्र काम करणार्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलतांना खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहीणीताई खडसे-खेवलकर, लालचंद सैनानी जिल्हा कोषाध्यक्ष भाजप, खा.शि.मंडळाचे संचालक बजरंग अग्रवाल, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष हरचंद लांडगे आदी जुने जाणते कार्यकर्ते व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विविध विषयांवर झाली चर्चा
अध्यक्षस्थानी खासदार ए.टी. पाटील होते. खासदार ए.टी. पाटील हे दूसर्या पक्षातून आले व त्यांना पक्षाने उमेदवारी दिली ते स्वकर्तृत्वाने किंवा स्वबळावर निवडून आले नाही, कार्यकर्त्यांनी त्यांना स्विकारले म्हणून निवडून आले व त्यांचे स्टार उघडले, असे अनेक जण असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. आपल्या मनोगतात माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी सांगीतले कि, मी तिन वेळा आमदार झालो. त्यानंतर माझे तिकीट कापले गेले म्हणून मी प्रचंड नाराज होऊन भाजपसोडून काँग्रेसमध्ये गेलो पण तिथे मन काही लागले नाही. आणि परत भारतीय जनता पक्षात नानाभाऊंच्या मुळे परत आलो. यावेळी बोलताना आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले की मी आज ज्या ठिकाणी आहे ती नाथाभाऊंच्या आशीर्वादाने आहे. मी सतत तालूक्यात पक्ष एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यासाठी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे प्रयत्न देखील महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगून नगरपालीकेत पक्षाच्या तिकिटावर एकच उमेदवार निवडून आला असला तरी पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहचविले.
नाथाभाऊ आम्हाला परके समजू नका -आ. चौधरी
आमदार शिरिष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले कि मी सुरूवातीला अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो. आणि नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. पक्षाचा 1 नगरसेवक नसून आमचे 11 देखील तूमचेच असल्याचे सांगून 1 आणी 11 आहेत, आम्हाला परके समजू नका, असे सांगून भविष्यात शिरिष चौधरी मित्र परिवाराचे 11 नगरसेवकही भाजपावासीय होतील याची जणू ग्वाहीच दिली. भारतीय जनता पक्षाचे रोपटे खान्देशात नानाभाऊंच्या प्रयत्नाने लागले. जे आज वटवृक्ष झाले. असल्याचे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगीतले. आ खडसे यांनी सांगितले की एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होईल असे बोलले म्हणजे टवाळक्या करतोय असे लोक म्हणायचे. परंतु आम्ही कधीही अशा गोष्टींना बळी पडलो नाही. नेहमी निष्ठेने पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या देशाचे जे हितसंबंध बनवले आहेत. त्यामुळे चिन धास्तावले आहे. त्यामुळे ते शेपूट घालून मागे पळाले. पंतप्रधान म्हणून आपण आज जो नरेंद्र मोदींचा जो वाढदिवस साजरा करतोय आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण आज जो कार्यक्रम करतोय या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांच्या जो सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी ची कृतज्ञता व्यक्त होते
भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार
यावेळी 100हून अधिक कार्यकर्त्यांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला. त्याच्या गौरवामुळे अनेक कार्यकर्ते भारावून गेले होते. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले. आभार तालूकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास भाजपा समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता तर पक्षात नवीनच दाखल झालेल्या व्यक्तींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले तर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या भाषण रसिकांचा मात्र भ्रमनिरास झाला.